Tue, Jul 23, 2019 02:38होमपेज › Solapur › विठ्ठल कारखान्यास मालमत्ता जप्तीची नोटीस

विठ्ठल कारखान्यास मालमत्ता जप्तीची नोटीस

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 9:41PMपंढरपूर : प्रतिनिधी

डिसेंबर 2016 ते मे 17 या काळातील साखर विक्री करून ग्राहक व व्यापार्‍यांकडून वसूल केलेला अबकारी कर सरकारी खात्यात भरणा केलेला नाही. या थकीत अबकारी कराच्या वसुलीसाठी वेणूनगर (ता.पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास केंद्रीय अबकारी खात्याकडून मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल, असे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या सोलापूर मंडल सहाय्यक आयुक्त सुमंगला शर्मा यांनी सांगितले आहे. 

यासंदर्भात शर्मा यांनी एक प्रसिद्धपत्रक प्रसिद्धीकरिता दिले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने डिसेंबर 2017 ते मे 2017 यादरम्यान विक्री केलेल्या साखरपोटी ग्राहक आणि व्यापार्‍यांकडून 3 कोटी 5 लाख रूपये अबकारी कर वसूल केलेला आहे. कराची ही रक्कम कारखान्याने केंद्रीय अबकारी खात्याकडे जमा करणे आवश्यक असताना अद्यापही रक्कम जमा केलेली नाही. यासंदर्भात अबकारी खात्याने कारखान्यास अनेकवेळा पत्रव्यवहार, समन्स बजावून थकीत रक्कम भरण्यास कळवले होते. मात्र कारखान्याकडून कसलीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे केंद्रीय अबकारी कायदा  1944 कलम 11 अन्वये कारखान्यास थकीत रक्कम वसुलीसाठी मालमत्ता जप्तीची नोटीस अबकारी कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुमंगला शर्मा यांनी 12 जून रोजी बजावली आहे. त्यानुसार लवकरच कारखान्याची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे. 

दरम्यान, काही तांत्रिक कारणाने अबकारी कराची रक्कम जमा करण्याचे राहून गेलेले आहे. मात्र या रकमेचे हप्ते पाडून देण्याची विनंती संबंधित खात्याला केली असून त्यानुसार हप्ते पाडून संपूर्ण थकीत रक्कम जमा केली जाईल, असे कारखान्याच्या अधिकृत सूत्रांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.