होमपेज › Solapur › विठ्ठल मंदिर समितीच्या अन्नछत्रामुळे भाविकांची उपासमार टळली

विठ्ठल मंदिर समितीच्या अन्नछत्रामुळे भाविकांची उपासमार टळली

Published On: Aug 09 2018 7:56PM | Last Updated: Aug 09 2018 7:56PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्रव्यापी बंदला आज पंढरपूर येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच घटकांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याने दुकाने, उपहारगृहे पूर्णपणे बंद राहिल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, याची दखल घेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आपले अन्नछत्र आज पूर्णवेळ खुले ठेवून भाविकांची उपासमार टळली. या अन्नछत्राचा लाभ सुमारे 5000 हुन अधिक भाविकांनी घेतला.

बुधवारच्या (ता. 8) एकादशीच्या निमित्ताने आणि संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात मोठ्या संख्येने भाविक आले होते. पण आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक भाविकांना आज आपापल्या गावी परत जाता आले नाही. शिवाय बंदला समाजातील सर्वच थरातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने, शहरातील सर्व दुकाने, उपहारगृहे आज दिवसभर बंदच राहिली. हॉटेल्सबरोबर अन्नपदार्थ विकणाऱ्या हातगाडयाही पूर्णपणे बंद झाल्याने परगावाहून आलेल्या भाविकांना चहा-नाश्ताच नाही तर पाणी मिळणेही दुरापास्त झाले. 
मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन मंदिर समितीने आज पूर्णवेळ अन्नछत्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. एरवी 12 ते 2 या वेळेत सुरू असणारे अन्नछत्र आज जवळपास 4 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहिल्याने, अनेक भाविकांच्या पोटाची उपासमार थांबली. याठिकाणी भाविकांसाठी पाण्यासह जेवण प्रसादाची सोय करण्यात आली होती. याचा लाभ 5000 हुन अधिक भाविकांनी घेतला. 

मंदिर समितीचे अन्नछत्र सुरू नसते तर आज दुपारी आम्हाला व आमच्या मुलाबाळांना उपाशीच राहावे लागले असते. पण मंदिर समितीच्या या निर्णयामुळे आमच्या पोटाला चांगला आधार मिळाला, अशा सकारात्मक प्रतिक्रिया यावेळी भाविकांनी व्यक्त केल्या.