Sun, Oct 20, 2019 01:08होमपेज › Solapur › व्हिसा मुदत संपल्याने मलेशियात अडकला माढा तालुक्यातील युवक

व्हिसा मुदत संपल्याने मलेशियात अडकला माढा तालुक्यातील युवक

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 10:03PM

बुकमार्क करा

माढा : वार्ताहर 

व्हिसा मुदत संपल्यामुळे मलेशियात अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांमध्ये माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील  अजय सुभाष शिंदे (वय 24) याचा समावेश असून तो येथील भारतीय दूतावासात असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

 व्हिसा फसवणूक प्रकरणात महाराष्ट्रातील काही तरुणांना मलेशियात अटक झाली आहे. याच तरुणांसोबत मलेशियात नोकरीनिमित्ताने शिंदेवाडी येथील अजय शिंदे हादेखील गेला आहे.  मागील तीन महिन्यांपासून तो मलेशियात आहे. त्याचा टुरिस्ट व्हिसा संपला आहे. त्याला वर्किंग व्हिसा मिळाला नाही. त्याच्यासोबत गेलेल्या इतर तरुणांना अटक झाल्याचे समजताच अजय याने थेट भारतीय दूतावास गाठले. सध्या तो भारतीय दूतावासात असून रविवारी दुपारी त्याचाशी संपर्कही झाल्याचे त्याचा लहान भाऊ आकाश याने सांगितले.

अजय शिंदे याच्या घरची परिस्थिती बेताची असून कुटुंबीयांकडे सहा एकर शेती आहे. घरात आई, वडील, भाऊ यांच्यासह चार सदस्य आहेत. अजयचे शिक्षण पदवीपर्यंत माढा येथे झाले. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स कराड येथे पूर्ण केला. त्यानंतर सांगली येथील एजंटमार्फत मलेशियात तो गेला. मलेशियात जाण्यासाठी त्याला एजंटने दीड लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे कुटुंबीयांनी उसनवारी करत जमवले. मलेशियात गेल्यानंतर तीन महिन्यांचा टुरिस्ट व्हिसा संपल्याने तेथेच वास्तव्य करीत पुढील वर्किंग व्हिसा त्यांना मिळू शकला नाही. अजयच्या इतर साथीदारांना मलेशियातील तुरुंगात टाकल्याची बातमी त्याला समजली. त्याने भारतीय दूतावास गाठले. त्याठिकाणी तो सुखरूप असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.