Tue, Mar 19, 2019 05:19होमपेज › Solapur › सोलापूर बंदला हिंसक वळण!

सोलापूर बंदला हिंसक वळण!

Published On: Jul 31 2018 1:38AM | Last Updated: Jul 30 2018 11:22PMसोलापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणप्रश्‍नी शांततेत सुरू असलेल्या सोलापुरातील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. सोलापूर बंदची हाक दिल्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून मोर्चे आणि धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यावर कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक आणखीनच आक्रमक होऊन त्यांनी विविध भागांत जाळपोळ, दगडफेक केली.

या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सक्तीने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. त्यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त आंदोलकांनी पोलिस उपायुक्तांची गाडीदेखील फोडली. शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दडपशाही केल्यानेच आंदोलन चिघळले, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. 

सोमवारी सकाळी दहा वाजता शिवाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखालील सर्कलमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले. सुमारे तासभर सुरू
 असलेल्या या आंदोलनामध्ये हातात भगवे झेंडे घेऊन तरुणांचे जत्थे सामील व्हायला लागले आणि पाहता पाहता शिवाजी चौकात हजारोंचा जनसमुदाय जमला.

परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याला सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी विरोध केला व पोलिसांच्या गाडीत बसणार नाही, अशी भूमिका घेतली. याचठिकाणी वातावरण गंभीर झाले. नेत्यांनी कार्यकर्त्यांना पुढे करत पोलिसांच्या गाडीत बसविले व स्वतः घटनास्थळी थांबत आंदोलनाची सूत्रे स्वतःच्या हाती ठेवली. मात्र कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे सत्र पोलिसांनी चालूच ठेवले होते. त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांच्या जमावातून थेट पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांच्या गाडीवर दगड भिरकविण्यात आला. त्यात गाडीच्या खिडकीची काच फुटली. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी अचानक लाठीमार सुरू केला आणि वातावरण चिघळले. 

शिवाजी चौकातून भागवत चित्रपटगृह, शिंदे चौक, निराळे वस्ती, तरटी नाका, सम्राट चौक आणि जुना पुणे नाका या सर्वच मार्गांवर जमाव पळत सुटला. त्यानंतर  शिंदे चौकातील रस्त्यावरील जमावाने जोरदार दगडफेक सुरु केली. त्यापाठोपाठ तरटी नाका रस्त्याकडून तेथील बंद असलेल्या दुकानांवरही दगडफेक सुरू झाली. त्यामुळे पोलिसांना नेमक्या कोणत्या बाजूला बंदोबस्त लावावा, अशी पंचाईत पडली. जमाव आटोक्यात येत नाही याचा अंदाज आल्यावर अपर्णा गिते यांनी कमांडो पथकाला पाचारण केले. त्यानंतर सर्व बाजूला कमांडो पथकांसह विविध अधिकार्‍यांनी कोंम्बिग ऑपरेशनला सुरुवात केली. गल्लीबोळात घुसून, घरात घुसून एकेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून गाडीत घातले. त्यामुळे घरांमध्ये बाया-बापड्यांची रडारड आणि विरोध सुरू झाला व रस्त्यावरचा संघर्ष घरापर्यंत पोहोचला. पोलिसांच्या रूटमार्चलाही पुन्हा गनिमीकाव्याने प्रत्युत्तर देण्यासाठी काही जमावाने विविध भागांत टायर, कापड जाळून आंदोलनात जाळपोळ सुरू केली. त्यामुळे पोलिसांनाही नेमक्या कोणत्या भागात जाऊन आंदोलनाची धग कमी करावी हा प्रश्‍न पडला. रात्री उशिरापर्यंत ही परिस्थिती कायम होती. आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी मराठा समाजाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते तसेच इतरांचीही रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरू होती. पोलिसांच्या या दडपशाहीचा मराठा क्रांती मोर्चाकडून चौकाचौकांत जमून निषेध व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनीच शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावल्याचा आरोपही करण्यात येत होता. 

शांतता राखा : आयुक्त महादेव तांबडे
शहरामध्ये आजपर्यंत झालेले चक्काजाम आंदोलन, जागरण-गोंधळ आंदोलन, मोर्चे अतिशय शिस्तीत झाले. त्याच पद्धतीने सोलापूर बंदचे आंदोलन शांततेत करावे, कोणीही कायदा हाती घेण्याचा प्रयत्न करू नये, सोलापुरातील आंदोलनाचा आदर्श राज्याने घ्यावा अशा शांततामय मार्गाने बंद पाळावा, असे आवाहन पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले होते. 

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सकाळीच घेतले ताब्यात
मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज या दोन्ही संघटनांकडून सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी नऊ वाजताच मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शिवाजी चौकापासून  मोर्चा काढण्यात आला. नवी पेठेतील पारस इस्टेट येथे आंदोलक एकत्र आले. तेथे मीडियाला प्रतिक्रिया दिल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. या मोर्चामध्ये दिलीप कोल्हे, माजी आमदार नरसय्या आडम, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, दास शेळके, प्रताप चव्हाण, भैय्या धाराशिवकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते.