होमपेज › Solapur › डाळिंब प्रक्रिया केंद्रासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू

डाळिंब प्रक्रिया केंद्रासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:31PM

बुकमार्क करा
अकलूज : तालुका प्रतिनिधी   

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने डाळिंब मार्केट सुरू केल्याने शेतकर्‍यांचा फायदा होणार असून व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढेल.डाळिंबावर प्रक्रिया करुन विविध उत्पादन करणारे केंद्र  सुरू करण्यासाठी बाजार समितीने प्रस्ताव तयार करावा. केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही खा.विजयसिंह  मोहिते-पाटील यांनी दिली.   

  सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी  वर्षा निमीत्त  शंकरराव मोहिते मुख्य मार्केट यार्ड व फळे भाजीपाला मार्केट येथे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या डाळिंब मार्केटचा शुभारंभ खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, आ. हणमंतराव डोळस, पं.स.सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, अर्जूनसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, बाजार समितिचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पं.स.उपसभापती किशोर सूळ, मुंबईचे पोलिस आयुक्त सिध्दार्थ कसबे,  किशोरसिंह माने पाटील, यांचेसह विविध  संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, परराज्यातील व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्ताविकात  सभापती  मदनसिंह मोहिते-पाटील म्हणाले, सहकार महर्षिंनी शेतकर्‍यांच्या शेती मालाला भाव मिळावा या हेतुने सन 1950 साली अकलूज बाजार समितीची स्थापना केली, शेती पुरक व्यवसायालाही प्राधान्य दिले.   आज अकलूज, नातेपुते, शिंदेवाडी, पिलीव येथे असणार्‍या समितीच्या उपकेंद्रामुळे मार्केट सुरुळीत व चोखपणे सुरू आहे. समितीने घोडेबाजार, कांदा बाजार, आंबा महोत्सव, मका, तुरडाळ हमी भाव केंद्र  सुरू केले. लवकरच समितीचे  ऑनलाईन बाजार सुरू होत असून यामुळे शेतीमालाची राज्यात व देशात विक्री होऊन शेतकर्‍यांचा  फायदा होणार आहे. तालूक्यासह  आजुबाजूच्या पाच तालूक्यातून मार्केटला डाळिंंब आले असून खरेदीसाठी परराज्यातील व्यापार्‍यांनी हजेरी लावली.  पहिल्याच दिवशी डाळींबाला 111 रू.भाव मिळाला. या बाजारात 40 व्यापार्‍यांची मागणी असताना जागे अभावी केवळ 28 व्यापार्‍यांनाच  स्टॉलची  संधी मिळाली असून लवकरच सर्व सुविधा निर्माण करणार आहे. शेतकर्‍यांनी शेततळे घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास उत्पन्न वाढणार आहे. 

बाजार समीतीच्यावतीने अकलूज येथे 231 तर नातेपुते  येथे 110 दुकान गाळे बांधून रोजगार निर्मिती केली आहे.  यावेळी डाळिंंब उत्पादक शेतकरी, व्यापारी, परराज्यातील व्यापारी यांचा सत्कार खा.विजयसिंह  मोहिते-पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी केले. आभार सदस्य बाहुबली चंकेश्‍वरा यांनी मानले.