Wed, Jul 17, 2019 00:19होमपेज › Solapur › सोलापूर : शाळा कर्मचाऱ्यांचा सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा 

सोलापूर : शाळा कर्मचाऱ्यांचा सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा 

Published On: Feb 25 2018 3:05PM | Last Updated: Feb 25 2018 3:05PMवैराग : प्रतिनिधी

विद्या मंदिर संस्थेच्या संचालित विद्यामंदिर हायस्कुल व विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत चार महिन्याचे वेतन न मिळाल्यास १ मार्च पासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे . तसेच शालेय व एसएससी बोर्डाच्या कामकाजावर होणाऱ्या परिणामास आम्ही जबाबदार राहणार नसल्याचे कळविले आहे .

याबाबत वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात कर्मचार्यांनी असे नमूद केले आहे की ,नोव्हेंबर २०१७ पासून त्याने वेतन कोणतेही संयुक्तिक किंवा कायदेशीर लेखी कारण न देता अदा करण्यात आलेले नाही .गेल्या चार महिन्यापासून वेतन न झाल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे गृहकर्जाचे हप्ते तसेच सोसायटीचे हप्ते थकीत राहिल्याने बँककडून जप्तीची कार्यवाही करणे संदर्भात वारंवार तगादा लावला जात असल्याने कर्मचाऱ्याचे मानसिक , आर्थिक , स्वास्थ्य बिघडलेने त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येवू लागला आहे .

चार महिन्यापासून वेतन अदा न झाल्याने प्रापंचिक गरजांचा डोंगर त्यांच्या समोर उभा राहिला असून कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा बिघडून कौटुंबिक नात्यात तणाव निर्माण झाला आहे .अनेक कर्मचाऱ्यांचे पाल्य उच्च शिक्षणासाठी परगावी शिक्षण घेत आहेत .त्यांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहून शैक्षणिक नुकसान होत आहे .आमचा कोणताही दोष नसताना आम्हाला आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत आहे. आशा परिस्थिती २८ फेब्रुवारी पर्यंत वेतन न मिळाल्यास १ मार्च पासून सर्व कर्मचारी दिर्घ रजेवर जाणार असल्याचा इशारा कर्मचार्यांनी निवेदन देवून दिला आहे .

निवेदनाच्या प्रती अध्यक्ष विद्या मंदिर संस्था वैराग ,उपसंचालक , पुणे विभाग पुणे, शिक्षण संचालक पुणे ,शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य ,शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य ,शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , शिक्षक आमदार ,स्थानिक आमदार ,जिल्हाधिकारी , मुख्यकार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलिस प्रमुख सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत .

याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की , महाराष्ट्रातील काही शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाली त्यामुळे त्याठिकाणी कार्यरत कर्मचारी संख्या पर्यायाने कमी झाली म्हणजे कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत .आता अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी समायोजित करण्यासाठी प्रयन्त होत आहेत .पण काही ठिकाणी संस्था चालक व मुख्याध्यापक या अतिरिक्त कर्मचाऱ्याना रुजू करून घेत नाहीत .यावर उपाय म्हणून शासनाने ज्या संस्था  किंवा शाळा अतिरिक्त कर्मचाऱ्याना रुजू करून घेत नाहीत त्याशाळांचे वेतन स्थगित करण्याचा मार्ग काढला आहे .यात सोलापूर जिल्ह्यातील ६६ शाळांचे वेतन स्थगित करण्यात आले आहे असे समजते .तर बार्शी तालुक्यातील सात शाळांचे वेतन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे . मात्र प्रशासनाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची ससेहोलपट होत असल्याचे वास्तव आहे .कारण संस्था किंवा शाळा अतिरिक्त कर्मचाऱ्याला रुजू करून घेत नाही याला बाकीच्या कर्मचाऱ्याचा काय दोष ? संस्था चालक , मुख्याध्यापक यांच्यावर काय कार्यवाही करायची ती करा आम्हाला का वेठीस धरण्यात येत आहे .या प्रश्नाचे उत्तर मात्र वेतन थकीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही . प्रशासनाचे मात्र " रोग म्हशीला अन इंजेक्शन पखालीला " असे झाले असल्याची चर्चा कर्मचारी वर्गात सुरू आहे.