Wed, Jul 17, 2019 10:06होमपेज › Solapur › तरी तू पंढरीसी जाय एक वेळ

तरी तू पंढरीसी जाय एक वेळ

Published On: Jul 23 2018 12:00AM | Last Updated: Jul 22 2018 11:23PMसंदीप गिड्डे, कराड

सुखा लागी करीसी तळमळ ।
तरी तु पंढरीसी जाय एकवेळ ॥
मग अवघाचि सुखरूप होसी।
जन्मोजन्मीचे दुःख विसरशी ॥

सुख पाहिजे असेल तर एकदा पंढरीला गेले पाहिजे मग पहा सर्व सुखच सुख मिळते जन्मोजन्मीचे दुःख नाहीसे होईल  हे खरेच आहे. या सुखाची प्रचिती  आळंदी पासून पंढरपूरातपर्यंत पायी चालत  आल्यानंतर येईल. कामातला ईश्‍वर शोधण्यासाठी वारी करायची असते. वारकरी देखील याच ईश्‍वराला शोधण्यासाठी पंढरीच्या वारीत सामील झालेले आहेत. आज साजर्‍या होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी सावळया विठ्ठलाच्या भक्‍तीरसात न्हाऊन गेलेले वारकरी टाळ मृंदगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात तल्‍लीन झालेले वारकरी पंढरीत  दाखल झालेले आहेत.  आपली वारी सावळया विठुरायाच्या चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांच्या मेळयाने अवघी  पंढरी न्हाऊन निघाली आहे. आज भगव्या पताक्यांनी पंढरीतील रस्ते भगवे झाले आहेत. आणि टाळ,मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने पंढरीचा आसमंत दुमदुमला आहे. पंधरा ते वीस दिवसाचा खडतर पायी प्रवास करून सावळया विठ्ठलाच्या ओढीने आलेला वारकरी आज सावळया विठ्ठलाला भेटून आंतरमनातून सुखावला आहे.  विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी भक्‍त देहभान विसरून गेले आहेत. 

पंढरीची वारी, जयाचे दारी

त्याची पाय धुळी लागो मज

एवढी लीनतेची आणि समतेची भावना वारकर्‍यांच्या मनात असते. कारण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक यात्रा भरतात पण ही पंढरीची वारी ही एक अनोखी वारी आहे. पंढरीच्या या वारी मध्ये अनेक  राज्यातील भाविक भक्‍त सामील होतात. अनेक जाती धर्माचे वारकरी, सामील होतात. या वारीमध्ये जात-पात-धर्म मानला जात नाही. लहान-थोर स्त्री-पुरूष भेद भाव केला जात नाही. उच्च नीच समजला जात नाही. सारेजण विठुरायाची लेकरेच आहेत असे मानले जाते.