Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Solapur › वारकरी सांप्रदायाचे तत्त्वज्ञान: ज्ञानोत्तर भक्‍ती बोध-वाणी

वारकरी सांप्रदायाचे तत्त्वज्ञान: ज्ञानोत्तर भक्‍ती बोध-वाणी

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:38PMह. भ. प. अ‍ॅड. जयवंत महाराज बोंधले,पंढरपूर

ज्या पदार्थची सत्ता कोणत्याही कालामध्ये बाधित होत नाही. त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रम्हतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहीत असून सत्, चित्, आनंद, नित्य पूर्ण असे आहे. हेच ब्रम्हतत्त्व संपूर्ण चराचरामध्ये भरलेले आहे. श्रुतीमाता आपणास स्पष्ट सांगते की, सर्व खल्विदं ब्रह्म । असे हे व्यापक ब्रम्हततत्त्व तेच मी आहे असा अनुभव येणे म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्‍त होणे होय. असा ब्रह्मज्ञानाचा अनुभव अंतरी आला असता त्याची चिन्हे देहावर उमटतात. असे तुकाराम महाराज सांगतात. 

उमटती ठसे । ब्रम्हप्राप्‍ती अंगी दीसे॥

ब्रम्हप्राप्‍तीची ही चिन्हे (ठसे) पाच आहेत. अभिन्नता, अभयरूपता, आनंदरूपता, अनन्यता, अजन्मस्थिती ही पाच चिन्हे आहेत. ब्रह्मज्ञान प्राप्‍त झालेला महात्मा सर्व सामान्याप्रमाणे जरी दिसत असला तरी देह संबंध पसार्‍याचा व त्यांचा काहीही संबंध उरलेला नसतो. काही कर्तव्य नाही. काही प्राप्‍तव्य नाही अशीच अवस्था झालेली असते. पंचदशीकार विद्यारव्यस्वामी सांगतात, 

धन्यो ऽ हं धन्यो ऽ हं कर्तव्य मे न विद्यते किंचित् ।
धन्यो ऽ हं धन्यो ऽ हं प्राप्‍तव्यं सर्वमद्य संपन्नम् ॥

पंचदशीकारांनी या अवस्थेलाच खर्‍या अर्थाची धन्यता सांगितलेली आहे. प्रापंचिक जीवनामध्ये सत्ता, संपत्ती, संतती प्राप्‍तीमध्ये धन्यता सांगितली जाते. परंतु पारमार्थिक जीवनामध्ये संतभेट व भागवत् प्राप्‍ती हीच खरी धन्यता आहे. या धन्यतेमध्ये काहीही प्रापंचिक कर्तव्य किंवा प्राप्‍तव्य राहीलेले नसते. ज्या ज्या इच्छा केल्या त्या सर्व पूर्ण झालेल्या असतात. तुकाराम महाराज सांगतात.

कृतकृत झालो । इच्छा केली ती पावला ॥

अशी ही परीपुर्णतेची अवस्था प्राप्‍त होणे व पुन्हा भागवंताच्या सगुण रूपांविषयी प्रेम निर्माण होऊन त्याच्या भजनात तल्‍लीन राहणे हे वारकरी संप्रदायाचे मुळ सुतृ आहेत. याकरीता ज्ञान गिळोनी गावा गोविंदु गा। हे वचन प्रसिध्द आहे. याकरिता आवश्यकता आहे ती भक्‍तिची । ज्ञानीयांचे राजे संत ज्ञानेश्‍वर महाराज सुध्दा म्हणतात. 

माझे मनीची आवडी । पंढरपूरा नेईन गुडी ॥

याकरीता लागणारी जी भक्‍ती आहे. ती कोणती? काय तिची व्याख्या? देवर्षी नारदमुनी भक्‍तिसुतृत सांगतात. 

सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा ।

भगवंतावर परमप्रेम असणारे म्हणजे भक्‍ती होय. प्रेमामध्ये वात्सल्यप्रेम, सख्यप्रेम, कामरूपी प्रेम आणि परमप्रेम असे प्रकार आहेत. यामध्ये परमप्रेम म्हणजे निष्काम प्रेम होय.  या प्रेमालाच भक्‍ती म्हणतात. संत सेना महाराज एकदा वारीला आले. जाताना पंढरपुरातील एक दगड घेऊन गेले वस्तारा लावण्याकरिता म्हणून. तेव्हा देव म्हणतात सेना महाराज वारीला आले नव्हते, दगड घेऊन जायला आले होते. सेना महाराजांना हे कळल्यावर पुढच्या वारीला जाताना तो दगड घेऊन जातात आणि तो जेथून उचलला होता तेथे टाकून देतात. पुन्हा पांडुरंग म्हणतात सेना महाराज वारीला आलेले नव्हते तर गेल्या वारीला घेऊन गेलेल्या दगड पोहोच करायला आले होते. याचा अर्थ असा की भक्‍तिमध्ये प्रापंचिक पदार्थाची कोणतीच घेणे-देण्याची अपेक्षा नाही. ती खरी भक्‍ती होय.  ब्रह्मज्ञान प्राप्‍त होणे हे अद्वैत व भक्‍ती म्हणे की द्वैत । असे असले तरी हे जे द्वैत आहे. ते कल्पित द्वैत आहे व असे कल्पित द्वैत हे भक्‍ताला अद्वैतापेक्षाही सुंदर आहे. भक्‍तिशास्त्रामध्ये भक्‍तिरसायन नावाच्या ग्रंथात मधुसुदन सरस्वती सांगतात.  

भक्त्यर्थं कल्पित द्वैतं अद्वैतादापि सुंदरम्।

वारकरी संप्रदायामध्ये याच तत्त्वज्ञानाचा सर्व साधुसंतांनी विचार सांगितलेला आहे. संत तुकाराम महाराज सांगतात.  

मी भक्‍त तु देव ऐसे करी या अवस्थेमध्ये भक्‍तीचा आनंद घेता येतात. घेतलेला आनंद इतरांना देता येतो. पंढरीच्या वारीमध्ये हेच चित्र आपणांस सर्वत्र दिसून येते. 

इथे सर्वजण आपले मोठेपण विसरलेले असतात. ब्रह्मज्ञानाची अवस्था प्राप्‍त होऊन पुन्हा भगवद्भक्‍ती कशी करता येते. याकरीता संत एकनाथ महाराज भागवतात सांगतात. 

शुध्द झालीया । 
स्वरूपप्राप्‍ती।
म्हणशी भजन कैशा रीती। 
देवभक्‍त तेचि ते होती । 
मी होऊनी भजती भजमाजी॥

अशा पध्दतीने शुध्द चैतन्यच देव व भक्‍त या रूपाने नटते आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान व भक्‍ती या दोन तत्वाचा समन्वय पहावयास मिळतो. शास्त्रीय दृष्टीने ज्ञान हीच सर्वश्रेष्ठ अवस्थ आहेत. परंतु वारकरी संप्रदायामध्ये या ज्ञान अवस्थेनंतरही भक्‍तीची अवस्था सांगितली आहे. 

यालाच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोत्तर भक्‍ती असे म्हणतात. हेच वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आहे. याच तत्वज्ञानात जगणारा हा पंढरीचा वारकरी आहे. म्हणून 
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥