होमपेज › Solapur › शिवपीठ ते भक्‍तिपीठ

शिवपीठ ते भक्‍तिपीठ

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:41PMविजयालक्ष्मी सरूडकर, नातेपुते

विठेवर उभा असणार्‍या पंढरपूरच्या विठ्ठलाने अनेकांचे जीवन व्यापून टाकले. निर्गुण निराकराची उपासना करणारे संत ज्ञानेश्‍वरांसारखे अनेक संत पंढरीच्या पांडुरंगाच्या सगुण साकार रूपाला भूलले. श्रीकृष्ण, विष्णू या देवतांचाच अवतार असणार्‍या विठ्ठलाशी संतजन एकरूप झाले. प्राचीन काळापासून राम आणि श्रीकृष्ण या दोन व्यक्‍तीरेखा भारतीयांच्या हृदयात स्थान करून राहिल्या आहेत. श्री कृष्णाची व्यक्‍तीरेखा तर भारतीय व्यक्‍तींचे जणू प्रतिनिधित्त्व करणारीच आहे. गाई गुरे राखणारा, बासरी वाचवणा, हा मुरलीधर आमच्या ग्रामजीवनाचे प्रतिबिंब होतो. ऐवढे सगळे असतानाही प्रसंग आल्यावर रणांगणावर तत्त्वज्ञान सांगणारे भगवान श्रीकृष्ण महान होते. 

साधारणपणे तेराव्या शतकात नामदेव ज्ञानेश्‍वरांनी वारकरी सांप्रदायाचा पाया घातला. या सांप्रदायाचे प्रामुख्याने खालील टप्पे आपल्याला लक्षात येतात. नामदेव ज्ञानेश्‍वरांचा कालखंड, एकनाथांचा कालखंड, तुकारामांचा कालखंड आणि आधुनिक गाडगेबाबांचा इ. स. नाच्या दहाव्या शतकात नाथ सांप्रदाय विस्तारू लागला. या सांप्रदायावर बुध्द, महावीरांचाही प्रभाव जाणवतो. सर्वसमावेशक विचार असल्याने थोड्याच अवधित हा लोकप्रिय झाला. आदिनाथांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांच्या कालावधीत विस्तीर्ण झाली. गोरक्षनाथांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. समतारथी विचार असल्याने अनेकांना हा सांप्रदाय भावला. संत ज्ञानेश्‍वरांची गुरू परंपरा नाथ सांप्रदायिक होती. 

आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव अशी ती सांगितली जाते. त्यांचे वडील काश्मिरी शैवागमाचे उपासक होते. म्हणजेच शैव व नाथांच्या विचारसणीत ज्ञानेश्‍वर घडत गेले. 
ज्ञानेश्‍वरी पाहिली की आपणाला जाणवते त्याची वृत्ती, निर्गुण उपासनेची होती. ओम नमोजी आद्या, या ओवीने ज्ञानेश्‍वरीची सुरुवात होते. म्हणजेच निर्गुण निराकाराची उपासना करणारे संत ज्ञानेश्‍वर विठ्ठलाच्या सगुण साकार रूपाच्या भक्‍तीत रममाण झाले. 

परंपरागत पध्दतीने ज्ञान आणि योग ही ईश्‍वरभक्‍तीची उच्चतम साधने सांगितली जातात. पण ज्ञानमार्ग आणि योगमार्ग सर्वसामान्य जनांच्या आवाक्याबाहेरचा आहे. ज्ञानेश्‍वरांना हा अध्यात्मप्रसाद जनसामान्यांना वाटायचा होता. शिवाय या दोहोंसाठीही परिपूर्ण गुरूंची आवश्यकता होती. पण सर्वांना गुरू सहजसाध्य थोडाच होणार आहे. त्यापेक्षा कर्ममार्ग आणि भक्‍तीमार्ग सर्व सामान्य जनांना सहजसाध्य आहे. वारकरी सांप्रदायाचा हा प्रवासच कर्म आणि भक्‍ती मार्गाच्या दिशेने झाला. इते भीमातिरावर असणारे विठ्ठल भक्‍तीरूपी सेवेसाठी सर्वसामान्यांना जवळचे वाटते. विठ्ठल ही देवताच विष्णू आणि श्रीकृष्ण युक्‍त आहे. कृष्णभक्‍ती ज्ञानेश्‍वरांना नवीन नव्हती. विठ्ठलाची उपासना प्राचीन कालखंडापासून सुरू आहे. ज्ञानेश्‍वरांच्या घराण्यातही पंढरीची वारी होती. 

प्रत्यक्ष विष्णूमूर्ती वाट पाहे नित्य।
उध्दरी पतित कोट्यान्कोटी॥

गुरूपरंपरा आणि घराण्याची परंपरा या दोहोंकडूनही विठ्ठलाची उपासना ज्ञानेश्‍वरांना मिळाली. सावळे परब्रह्म हा उल्लेख ज्ञानेश्‍वरीत आहे. पुंडलिकासाठी परब्रह्म चंद्रभागातीरी अवतीर्ण झाले. पंढरपूर आणि विठ्ठल या विषयांवर अनेक अभ्यासकांनी प्रकाश टाकला आहे. त्यामध्ये दत्तोपंत ब्रेंद्रे, डॉ. भांडारकर, ग. ह. खरे, डॉ. शं. दा. पेंडसे यांच्या उल्लेख करावा लागेल. यातील बहुतेकांच्या मते पंढरपूर हे प्राचीन शिवतीर्थ होते. पांडुरगं म्हणजे शुभ्रवर्णीय शिव यालाच कानडीत पंडरंग म्हणतात. त्यावरून पांडुरंग हे नाव आले असावे असे अभ्यासकांना वाटते. भक्‍त  पुंडलिकाच्या समाधीवरही शिवलिंग आहे. यावरून ते शैव असावेत. विठ्ठलाचा कर्नाटकाशी संबंध या स्वरूपाचा असल्याने कानडा विठ्ठल असा उल्लेख अनेक संताच्या अभंगात येतो. नामदेवांपासून हरिहर ऐक्याचा विचार अनेक ठिकाणी आहे.  तात्पर्य दोन परंपरा एक वैष्णव आणि दुसरी शैव दोन्हीही परंपरा वैदिक काळापासून पण उपासकामध्ये यामुळे द्वैत निर्माण झाले. तात्विक दृष्टीने एक असणार्‍या या दोन्ही गोष्टीतील भेद संतांनी विठ्ठलभक्‍तीमुळे मिटवून टाकले. संतांनी विठ्ठलाच्या सावळ्या मुर्तीला भक्‍तीस्वरूपात पाहिले. नंतर निर्माण झालेल्या अनेक सांप्रदायांनी हा विचार स्वीकारला. खर्‍या भारतीय वैदिक विचाराला जो भेदशीर होता. समतावादी होता. त्याला संतांनी वारकरी सांप्रदायाच्या रूपाने बळकटी आणली. 

नामा म्हणे शिव विष्णू एकरूप ॥

ही ऐक्यभावाना वाढीस लागतो. पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या कपाळावर शिवलिंग आहे आणि प्रभू रामचंद्रांनी रामेश्‍वराची उपासना केली. तात्पर्य शिव आणि विष्णू या एकाच देवतेत विठ्ठलरूप दिसते. विठ्ठलभक्‍तीने क्रांती केली. धर्मातील आदर्शतत्वे जी स्वहित व समाजहिताच्या दृष्टीने पुरक असतात.  ती सर्वसामान्यांना सापडली आणि पंढरपूरचा प्रवास शिवपीठ, ज्ञानपीठ असा होत. तो भक्‍तीपीठापर्यंत आला सर्व  जातीधर्माला एक बळकट आधार मिळाला आणि भीमातीरावरून ऐक्याची गंगा वाहती झाली.