Thu, Jun 20, 2019 02:10होमपेज › Solapur › पंढरीची वारी म्हणजे एकात्मतेचे दर्शन व मानवी जीवन मुल्यांची जोपासना

पंढरीची वारी म्हणजे एकात्मतेचे दर्शन व मानवी जीवन मुल्यांची जोपासना

Published On: Jul 23 2018 12:00AM | Last Updated: Jul 22 2018 11:30PMनितीन शिंदे, भाळवणी

पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा ।
शेषा सहस्त्रमुखा नं वर्ण वेची ॥
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी ।
जन्मोजन्मी वारी घडली तया ॥

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाचे दर्शन घडवणारी एक महान परंपरा आहे. या वारीने परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्मांना, पंथांना सामावून घेतले. अशी महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवणारी वारी, म्हणून पंढरीच्या वारीचा हा सुखसोहळा, पाहीन मी याची देही याची डोळा असं म्हणत आजही लाखों वारकरी आपल्या सावळ्या विठुरायाचे गोजिर रूप पाहण्यासाठी वारीत पायी पंढरपूरपर्यंत चालत येतात.

पंढरीची वारी म्हणजे वारकर्‍यांची दिवाळीच असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर, जगद‍्गुरू तुकाराम, एकनाथ, नामदेव, सोपानकाका, मुक्ताबाई, गजानन महाराज अशा अनेक संतांच्या पालख्या, दिंडी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विविध ठिकाणाहून पांडुरंगाच्या दर्शनाला अतिशय शिस्तीत निघालेल्या असतात. ठिककिाणी अन्नदाते अगदी आनंदाने वारकर्‍यांना अन्नदान करतात. आषाढी महिन्यात असणारी पंढरीची वारी म्हणजे एक आनंदी सोहळाच म्हणावा लागेल. संतांनी वारीचे जे सुख अनुभवले तेच आपल्याला दिले. 

आम्हा सापडले वर्म । 
करू भागवत धर्म ॥ 

हे ध्येय निश्‍चित करून ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, एकनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई आदी संतानी वारकरी सांप्रदायाचे मुळतत्व समजावून सांगितले. जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भागवंत अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला. 

आधी रचिली पंढरी । 
मग वैकुंठ नगरी । 
जेव्हा नव्हते चराचर । 
तेंव्हा होते पंढरपूर । 

अशी नामदेवांची दृढश्रध्दा आहे. कारण बाराव्या शतकात संत ज्ञानदेवादी भावंडांनी पंढरीचा विशेष महिमा गायिला.

माझे जीवीची आवडी। पंढरपूर नेईन गुढी ।

ही ज्ञानदेवांची धारणा होती.     

संत चोखोबा म्हणतात, 

खटनट यावे शुध्द होवूनी जावे। दवंडी पिटी भावे चोखामेळा ॥ 
टाळी वाजवावी, गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची॥ 

यातूनच लक्षावधी स्त्री-पुरूषांच्या नि:सत्व जीवनक्रमाला अध्यात्माची जोड देण्यामागील वारकरी सांप्रदायाचा उदार दृष्टीकोन दिसून येतो. या महाराष्ट्राच्या महान सात्विकतेचा, भावभक्तीचा व नि:स्वार्थाचा प्रभावी संस्कार वारकरी संतांनी केला. 

वारकरी हा सगुण-भक्तीचा पाईक आहे. वारीमधून मानवी जीवनमुल्य जोपासली जातात. अध्यात्माचे, भक्तीचे व आचरणाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. समता-बंधुत्वाची शिकवण मिळते. 

होय-होय वारकरी । 
पाहे-पाहे रे पंढरी ॥ 

असे मुखी गजर करित वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतो.