Sun, May 26, 2019 20:57होमपेज › Solapur › वैकुंठ एकादशीनिमित्त बालाजी दर्शनासाठी गर्दी

वैकुंठ एकादशीनिमित्त बालाजी दर्शनासाठी गर्दी

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:19PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

वैकुंठ एकादशीनिमित्त शुक्रवारी दाजी पेठेतील व्यंकटेश्‍वर देवस्थान भाविकांच्या अलोट गर्दीने फुलले होते.  ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी दिवसभर तसेच सायंकाळीदेखील भक्‍तगणांची रिघ लागली होती. 
भगवान बालाजींचे वैकुंठ एकादशीनिमित्त दर्शन घेणे हे पवित्र समजले जाते. सोलापूरसह देशभरातील लाखो भाविक यादिवशी दर्शनासाठी खास तिरूमलाला जातात.  या दिवसाचे विशेष म्हणजे जे भक्‍त ‘श्रीं’चे दर्शन करतील त्यांची मनोकामना पूर्ण होते व ‘श्रीं’चे वैकुंठम्मध्ये दर्शन केल्याचा आनंद प्राप्‍त होतो, अशी धारणा आहे. तिरूमला येथील मंदिरात यादिवशी उत्तरद्वारातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येते. 

शुक्रवारी वैकुंठ एकादशीनिमित्त दाजी पेठेतील व्यंकटेश्‍वर देवस्थानात अध्यायनोत्सव कार्यक्रम झाले. सकाळी 5 वाजता पालखी सेवा, श्री वैकुंठम् एकादशी उत्तरद्वार दर्शनम् तसेच सकाळी साडेनऊ वाजता वाजता दिव्य प्रबंधपाठ, आराधना, भोग, आरती, शातुमोरा व तीर्थप्रसाद गोष्टी आदी कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी सात ते सायंकाळपर्यंत ‘श्रीं’च्या दर्शनासाठी रिघ लागली होती. मंदिर परिसर विविध फुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आले होते. फुलांच्या सहाय्याने विठ्ठल-रुक्मिणीचे सुंदरपणे सजविलेला अवतार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. देवस्थानचे अध्यक्ष जयेंद्र द्यावनपल्ली, उपाध्यक्ष रायलिंग आडम, सचिव राजेशम येमूल, नरहरी चिप्पा, व्यंकटेश चिलका, राजीव जक्कन, गोविंद बुरा, श्रीनिवास गाली  आदी यावेळी उपस्थित होते. 

शनिवार, 30 डिसेंबर ते 1 जानेवारी याकालावधीत पालखी सेवा, दिव्य प्रबंध पाठ, आराधना, भोग, शातुमोरा, सायंकाळी पालखी सेवा, दिव्य प्रबंध पाठ, आराधना, भोग, शातुमोरा हे कार्यक्रम होणार आहेत.  मंगळवार, 2 जानेवारी रोजी पालखी सेवा, उत्सवमूर्ती महाअभिषेक, दिव्य प्रबंध पाठ, श्री शठकोपस्वामींचे मोक्ष उत्सवम्आळ्वार परमपदोत्सवम्, तीर्थप्रसाद गोष्टी, अध्यायनोत्सव हे कार्यक्रम होणार आहेत. 

रविवार, 14 जानेवारी रोजी ‘श्री गोंदाबा समवेत ‘श्रीं’च्या उत्सवमूर्तीस अभिषेक, श्री गोंदाबा कल्याणोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत. सध्या देवस्थानम्मध्ये धनुर्मासनिमित्त 14 जानेवारीपर्यंत धनुर्मास कार्यक्रम पहाटे 5 वाजल्यापासून होत  असून त्याचा भक्‍तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यंकटेश्‍वर देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. शुक्रवारी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.