Mon, Jun 24, 2019 21:17होमपेज › Solapur › कारनामेखोर रोखपालाचा ११ लाखांवर डल्ला

कारनामेखोर रोखपालाचा ११ लाखांवर डल्ला

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 8:58PM

बुकमार्क करा

उस्मानाबाद : प्रतिनिधी

आरोग्य विभागातील रोखपालाने 11 लाख रुपये हडपल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आता चौकशीसाठी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली आहे. याची कसून चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

वरिष्ठ लेखापरीक्षक एस. डी. जावळे यांनी सादर केलेल्या अहवालात रोखपाल राजेंद्र निंबाळकर याने 11 लाख रुपयांची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाने धुळे जिल्हा परिषदेतील 1990 मध्ये उघडकीस आलेला घोटाळा या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. भास्कर वाघ याने धुळे जिल्हा परिषदेला जसा चुना लावला त्याच पद्धतीचा अवलंब करीत निंबाळकर यानेही 9 हजार रुपये अंकाच्या मागे 9 लिहून 99 हजार रुपये लाटले आहेत. अर्थात हे केवळ एक उदाहरण आहे. उमरग्यातील जिल्हा परिषदेची इमारत आकाशवाणीला भाड्याने दिलेली होती. अनेक वर्षांनंतरही भाड्याची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेस फंडात जमा झालेली नव्हती. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर रोखपालाच्या लिला उघडकीस येऊ लागल्या आहेत. 2016-17 या आर्थिक वर्षातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते वितरणाची तपासणी स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने केली. त्यात रोखपालाने स्वत:च्या खात्यावर 37 हजार 635 रुपयांची रक्कम जमा केल्याचे निदर्शनास आले आहे. दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी असलेल्या 1 लाख 95 हजार रुपयांच्या रकमेवरही निंबाळकर याने डल्ला मारला आहे. ही रक्कम प्रत्येकी 15 हजार रुपयांप्रमाणे 55 जणांना वितरीत केल्याची नोंद वहीत असली तरी प्रत्यक्षात ती रक्कम  स्वत:च्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. असे अनेक कारनामे या लेखा परीक्षण अहवालातून उघड होत आहेत. लेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटले आहे की, रोखपालाने 11 लाख 6 हजार 215 रुपयांची अफरातफर करुन ही रक्कम स्वत: लाटली आहे. ती व्याजासह वसूल करणे आवश्यक आहे.

कठोर कारवाई करू : डॉ. संजय कोलते

दरम्यान, याबाबत मुख्याधिकारी डॉ. कोलते यांनी दोषीची गय केली जाणार नाही, असे सांगितले. वेगवेगळी पथके चौकशी करीत असून अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई करु, अशी प्रतिक्रिया दै.पुढारीशी बोलताना दिली.