होमपेज › Solapur › रेल्वेचा मालधक्का असुरक्षित!

रेल्वेचा मालधक्का असुरक्षित!

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:37PMसोलापूर : इरफान शेख

रेल्वेस्थानकाशेजारी असलेल्या रेल्वे मालधक्क्यावरील सुरक्षेचा प्रश्‍न दिवसेंविदस वाढत चालला आहे. येथे येणार्‍या प्रत्येक मालाची चोरी वाढली आहे. याचा भुर्दंड मात्र ट्रान्स्पोर्टधारकांना सोसावा लागत आहे. यामुळे ट्रान्स्पोर्टधारक वैतागले असून रेल्वे प्रशासनाचे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येकडे दुर्लक्ष असल्याची माहिती ट्रान्स्पोर्टधारकांनी दिली.

रेल्वे मालधक्क्यावर दररोज अन्नधान्याचे पोते, सिमेंटचे पोते, खते व बि-बियाणांचे हजारो किंवा लाखो पोते येत असतात. मात्र रात्री येथील गोडावूनमधून या पोत्यांची चोरी अधिक प्रमाणात होत आहे. या चोर्‍या वाढल्याने ट्रान्स्पोर्टधारक हवालदिल झाले आहेत. दररोज सुमारे 150 ते 200 पोती चोरीस जात आहेत.

रेल्वे प्रशासनास अनेकवेळा सांगून व तक्रार करुनदेखील या समस्येचा निपटारा होत नसल्याने शेवटी ट्रान्स्पोर्टधारकांनी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयात धडक मारली.

अधिकार्‍यांकडून पाहणी
गेल्या बुधवारी सकाळी सोलापूर शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी  घटनास्थळाची पाहणी केली व या समस्येवर उपाययोजना करु, असे आश्‍वासन दिले. रेल्वे मालधक्क्यावरील असलेल्या गोडावूनशेजारी असणार्‍या कंपाऊंडच्या भिंतीला मोठमोठे भगदड पडल्याने चोर्‍या करणारे चोर सहजरित्या माल चोरी करत आहेत. 
रामवाडी परिसरातील एका मैदानातून हे चोर दुचाकीवर  येतात व मालाची चोरी करतात. टोळी करुन येतात. जवळच असलेल्या मैदानात साठवणूक करतात. तेथून मोठ्या वाहनात भरुन  माल लंपास करतात. ही बाब रेल्वे प्रशासनास अनेकवेळा सांगूनदेखील दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात  आली. 

बंदोबस्त वाढविण्याची मागणी
याबाबत शिवानंद कोनापुरे यांनी दै. ‘पुढारी’ला माहिती देताना सांगितले की, भविष्यात याठिकाणी स्वखर्चाने सीसीटीव्ही लावू.आरपीएफ व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Tags : solapur, Railway,  Maldhaka