Sun, May 26, 2019 12:58



होमपेज › Solapur › सोलापूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ४ जणांवर गुन्हा

सोलापूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ४ जणांवर गुन्हा

Published On: Mar 21 2018 7:52PM | Last Updated: Mar 21 2018 8:15PM



वैराग (सोलापूर)  :  प्रतिनिधी 

जीवे मारण्याची धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गैरमार्गाने गर्भपात केल्याप्रकरणी तुळजापूर येथील एका महिला डॉक्टरसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वैराग पोलिसात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी महिला आपल्या दोन मुली व दोन मुलासह कासारी, ता.बार्शी येथे राहते तर फिर्यादीचा नवरा सरोळे, ता. बार्शी येथील बाळासाहेब सदाशिव बुद्रुक यांच्यात सालगडी म्हणून कामास आहे. गेल्यावर्षी दिवाळीत पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने फिर्यादी व तिचा पती अल्पवयीन मुलीस तुळजापूर येथील अंबाई हॉस्पिटल येथे २० अक्टोंबर २०१७ रोजी घेऊन गेले. त्यावेळी सदर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉ सिंधू कदम यांनी सांगितले.

त्यानंतर पीडित मुलीस तिच्या आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडित मुलीने सांगितले की, गेल्या जून महिन्यात तुम्ही सोलापूरला गेला होता तेव्हा मी मालकाच्या शेतात शेळी राखत होते. त्यावेळी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कृष्णा रामचंद्र गाटे रा. सारोळे हा त्याठिकाणी आला. त्याने शेजारच्या ऊसाच्या शेतात नेहून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. त्यावेळी कृष्णा गाटेचा भाऊ मारुती गाटे त्याठिकाणी आला. त्याने झाला प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीचे आई वडील गावाला गेले असता ७ जून २०१७ ला पुन्हा सलग आठ दिवस मालकाच्या शेतात नेहून पिडीत मुलीवर बलात्कार केला. याबाबत पिडीत मुलीचे वडिल विचारण्यास गेले असता गर्भ खाली कर नाहीतर जीवे मारून टाकीन म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली.

त्यानंतर पिडीत मुलीस तिचे आई-वडील अंबाई हॉस्पिटल तुळजापूर येथे २६ अक्टोंबर २०१७ ला घेऊन गेले.  त्यावेळी डॉ. सिंधू कदम यांनी जबरदस्तीने पिडीत मुलीच्या पोटातील गर्भपात केला व काढलेला गर्भ प्लास्टिकच्या बॅगमध्ये घालून फिर्यादीच्या हातात दिला. तो गर्भ घेऊन सर्वजण कासारी येथे आले असता त्याठिकाणी कृष्णा गाटे व बाळराजे गाटे हे दोघे आले व त्यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन सदरचा गर्भ शेतात पुरण्यास सांगितला. तो गर्भ पुरल्यानंतर कृष्णा गाटे याने तुमची मुलगी आठरा वर्षाची झाल्यावर तिच्या बरोबर लग्न करतो म्हणाला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात फिर्यादीस तू पुन्हा शेतात यायचे नाही तू पुरावे नष्ट कर असे  म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी कृष्णा रामचंद्र गाटे, बाळराजे उर्फ रविराज विठ्ठल गाटे, मारुती रामचंद्र गाटे सर्व राहणार सारोळे, डॉ सिंधू कदम अंबाई हॉस्पिटल तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेचा पुढील तपास सपोनि सचिन पत्रे करीत आहे .