Fri, Nov 16, 2018 21:37



होमपेज › Solapur › टेम्पो उलटून तिघे ठार

टेम्पो उलटून तिघे ठार

Published On: May 19 2018 10:03PM | Last Updated: May 19 2018 9:50PM



उमरगा : प्रतिनिधी

लातूरहून सागवानी फळ्या घेऊन कर्नाटकातील रायचूरच्या दिशेने भरधाव निघालेला आयशर टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात तीन कामगार जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास लातूर-गुलबर्गा रोडवरील माडज शिवारात घडली. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे.

जमाप्पा मल्लप्पा मडिवाल (वय 41), हणमंत नरसाप्पा मडिवाल (वय 43, दोघेही रा. शिंगनोडी, जि. रायचूर, कर्नाटक) व सतीश (पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) अशी तिघा मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लातूरहून सागवानी फळ्या घेऊन आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. 13 एएन 6956) हा रायचूर (कर्नाटक)च्या दिशेने भरधाव निघाला होता. हा टेम्पो शनिवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास लातूर-गुलबर्गा मार्गावरील माडज शिवार (ता. उमरगा) येथे आला असता  निष्काळजीपणापणामुळे चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. 

टेम्पोमध्ये बसलेल्या 5 कामगारांच्या अंगावर सागवानी फळ्या पडल्याने यात जमाप्पा मल्लप्पा मडिवाल  (वय 41), हणमंत नरसाप्पा मडिवाल (वय 43, दोघेही रा. शिंगनोडी, जि. रायचूर, कर्नाटक) व सतीश (पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) हे तिघेजण गुदमरुन जागीच ठार झाले. व्ही. वीरभद्रराव (वय 40) आणि एम. तायप्पा (58, दोघेही रा. रायचूर) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, फौजदार बालाजी भूमकर, पोहेकॉ वाल्मिक कोळी, पोना. नागनाथ वाघमारे, मनोज दळवी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना नानीज धाम संस्थानच्या रुग्णवाहिकेने उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यातील तिघे मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले़. दोन गंभीर जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत.याप्रकरणी उमरगा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. याचा पुढील तपास पोउप निरीक्षक डी. व्ही. सिध्दे हे करीत आहेत.