Sat, Aug 24, 2019 21:35होमपेज › Solapur › उजनीच्या गाळमोर्‍यांमधून पाणीगळती

उजनीच्या गाळमोर्‍यांमधून पाणीगळती

Published On: May 07 2018 11:57PM | Last Updated: May 07 2018 11:50PMबेंबळे : वार्ताहार

उजनी धरणाची निर्मिती शेती अन् शेतकर्‍यांसाठी झाली  खरी पण प्रत्यक्षात तसा वापर होताना दिसत नाही. पाणी वापराचा नियम हा प्रथम पिण्यासाठी, द्वितीय शेती अन् तृतीय उद्योगासाठी असा आहे. मात्र, प्रत्यक्षात शेती शेवटी राहते अन् उद्योगधंद्याला पहिले पाणी दिले जाते. पाणीवाटप  उन्हाळी प्रगटनामध्ये भीमा नदीला वगळणार्‍या प्रशासनाला उजनी धरणातून होणारी गळती का दिसत नाही, हेच कळेना झाले आहे.

एकीकडे  सोलापूर जिल्ह्यासह राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. मात्र, उजनी धरणाच्या चार गाळमोर्‍यांमधून शेकडो एकर क्षेत्र भिजेल इतके पाणी वाया जातेय. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही गळती सुरू आहे. पण, निधीअभावी आणि राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मोर्‍यांचे काम रखडले आहे.

 पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतल्या शेतकर्‍यांसाठी हे धरण वरदान ठरले आहे. साधारणतः 40 ते 42 वर्षांपूर्वी हे धरण अस्तित्वात आले. शेतकर्‍यांसाठी वरदान असलेल्या या धरणाच्या चार गाळमोर्‍यांमधून दररोज हजारो लीटर पाणी गळत आहे. गाळमोर्‍यांची दुरुस्ती वेळीच झाली नाही, तर भविष्यात मोठा धोका उद्भवण्याचा धोका आहे.

धरणातून होत असलेल्या या गळतीबाबत वेळोवेळी अधिकार्‍यांसह राज्य आणि केंद्रातल्या मंत्र्यांना माहिती देण्यात आली होती. निधीची मागणी करणारी पत्रेही पाठवण्यात आली. मात्र, या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. या गळतीमुळे आज धरणाच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. याविरोधात काही सामाजिक संघटनांनी आंदोलन उभे करण्याचा इशारा देऊनही 
शासनाला, प्रशासनाला  काही फरक पडलेला दिसत नाही.

उजनी धरणाची पाणीपातळी सध्या धोकादायकरित्या खाली गेली आहे. ही गळती तातडीने रोखणे गरजेचे आहे. उजनी धरणाची पाणीपातळी कमालीची घसरली आहे. धरणाची वाटचाल प्लसकडून मायनसकडे चालू असल्याने आता तरी सरकारने याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी धरणावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांची मागणी आहे. उजनी धरणाची पाणीपातळी वरचेवर कमी होत चालली आहे. ही गळती कित्येक वर्षांपासून चालूच आहे. याबाबत धरण प्रशासनाशी संपर्क साधला असता यांत्रिकी विभागाने या गाळमोरीवर गेट न बसविल्यामुळे ही गळती बंद करता येईना झाली आहे.