Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Solapur › उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग घटला

उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग घटला

Published On: Aug 25 2018 11:33PM | Last Updated: Aug 25 2018 11:31PMबेंबळे : सिद्धेश्‍वर शिंदे

सोलापूर जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाच्या टक्केवारीचा काटा पुन्हा स्थिर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत सातत्याने उजनी धरणातील पाणीसाठ्यात रोजच 7 ते 8 टक्के वाढ होत होती. परंतु, आता दौंड येथून होणारा 60 हजार क्युसेकचा विसर्ग घटून 18 हजार क्युसेकवर आल्याने उजनी भरण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

उजनी धरणात यावर्षी जो पाणीसाठा झाला तो टप्प्याटप्प्याने झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात पावसाने पहिला टप्पा पूर्ण केला. जुलै 23 रोजी उजनी धरण प्लसमध्ये आले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. अशी मजल-दरमजल करत उजनीने 25 टक्क्यांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर उजनीवरील धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शनिवार, 25 ऑगस्टपर्यंत उजनी धरण 94 टक्के भरले आहे.मात्र, आता उजनीसह वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबला असल्याने दोन दिवसांपूर्वी दौंड येथून होत असलेल्या 60 हजार क्युसेकच्या विसर्गात कमालीची घट होऊन तो केवळ 18 हजार 720 क्युसेक झाला आहे. त्यामुळे आता उजनी पुन्हा काही दिवस स्थिर राहणार आहे. 

दरम्यान, वरील धरणांतून होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील विसर्गामुळे उजनी 100 टक्के भरणार, अशी खात्री होती. त्यामुळे अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. परंतु, आता दौंडचा विसर्ग घटल्याने उजनी धरण भरण्यास आणखी तीन ते चार दिवस लागू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

नीरा नदीत वीरमधून सोडण्यात आलेल्या विसर्गात घट केल्यामुळे भीमा नदीतील पाणीपातळी घटली आहे.