Fri, May 24, 2019 08:40होमपेज › Solapur › उजनीतून कालव्यात सिंचनासाठी दुसरे आवर्तन 

उजनीतून कालव्यात सिंचनासाठी दुसरे आवर्तन 

Published On: May 08 2018 12:01PM | Last Updated: May 08 2018 12:00PMबोंडले : विजयकुमार देशमुख

उजनी धरणामधून उजनीच्या मुख्य कालव्यात मंगळवार दि.८ मे रोजी रात्री २ वाजता ३५० क्युसेस वेगाने उन्हाळी हंगामाचे सिंचनासाठी दुसरे आवर्तन सोडण्यास सुरवात झाली.  त्यामध्ये पहाटे ५ वाजता वाढ करण्यात आली असून कालव्यातून सद्या १२५० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये टप्प्या-टप्प्याने आणखी वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

उजनी धरणातून कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यामुळे उजनी उजवा व डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनामुळे कालवा लाभक्षेत्रामधील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली होती. त्याचबरोबर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापुरचे अधिक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले यांनी योग्य नियोजन केल्यामुळे उजनी धरणातून कालव्यात उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन योग्य वेळी सुटले आहे. 

दरम्यान उजनी धरणामध्ये मंगळवार दि.८ मे रोजी सकाळी ८ वाजता पाणी पातळी ४९२.१२० मीटर, एकूण पाणी साठा २०२९.३९ द.ल.घ.मी, उपयुक्त साठा २२६.५८ द.ल.घ.मी, तर धरणामध्ये एकूण पाणीसाठा ७१.६६ टीएमसी एवढा असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ८ टीएमसी एवढा आहे  व धरणाची टक्केवारी १४.९३ टक्के एवढी आहे.
 

Tags : ujani dam, second awartan, main canal, solapur news