Tue, Aug 20, 2019 04:06होमपेज › Solapur › उजनी कालव्यातून उन्हाळी हंगामाचे पाणी सोडले

उजनी कालव्यातून उन्हाळी हंगामाचे पाणी सोडले

Published On: Mar 15 2018 2:34PM | Last Updated: Mar 15 2018 2:37PMबोंडले (सोलापूर) : विजयकुमार देशमुख

उजनी धरणामधून उजनीच्या मुख्य कालव्यामधून  गुरूवारी दि.१५ मार्च रोजी रात्री १.३० मि. २०० क्युसेस वेगाने उन्हाळी हंगामाचे सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्यास सुरवात झाली. त्यामध्ये पहाटे ४.३० मि वाढ करण्यात आलेली असुन कालव्यातून ४०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये टप्प्या टप्प्याने आणखी वाढ करण्यात येणार आहे.

कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यामुळे उजनी उजवा व डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनामुळे कालवा लाभक्षेत्रामधील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

मागील वर्षी उजनी धरणाच्या कालवा लाभक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला असला तरी देखील उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विहरीच्या व बोअरवेलच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झालेली होती. पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्यामुळे विहिरी व बोअरवेल अखेरच्या घटका मोजत असताना पहावयास मिळत होते. यामुळे कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडण्याची मागणी होत होती.

दरम्यान उजनी धरणामध्ये गुरुवार दि.१५ मार्च रोजी दुपारी १ वाजता पाणी पातळी ४९५.४१५ मीटर, एकूण पाणी साठा २८७२.८१ द.ल.घ.मी, उपयुक्त साठा १०७०.०० द.ल.घ.मी, तर धरणामध्ये एकूण पाणीसाठा १०१.४४ टीएमसी एवढा असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ३७.७८ टीएमसी एवढा आहे व धरणाची टक्केवारी ७०.५२ टक्के एवढी आहे.