Wed, Apr 24, 2019 19:55होमपेज › Solapur › उजनीची पाणी पातळी तिशी पार

उजनीची पाणी पातळी तिशी पार

Published On: Jul 31 2018 1:38AM | Last Updated: Jul 30 2018 11:18PMभोसे (क) : अण्णासाहेब पवार

उजनी धरणाने दीर्घ प्रतीक्षेनंतर उपयुक्त साठ्याकडे यशस्वी वाटचाल केली असून, आतातरी कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी व्यक्त करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिलेली असताना पुणे जिल्ह्यात आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरण 33 टक्के भरले आहे. उजनीमध्ये आठ जुलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली. तो विसर्ग अजूनही कमी-जास्त प्रमाणात सुरूच आहे.

आज रोजी (ता. 29) दुपारी 12 वाजता धरणातील पाणी पातळी 493.315 मी. आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 2304.82 दलघमी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 502.01 मी. आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 4 हजार 164 क्युसेक पाणी येत आहे. तर धरणाची टक्केवारी 33.09 टक्के एवढी समाधानकारक आहे.

     जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मोहोळ तालुक्यात अध्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही. पाऊसच नसल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढलेली नाही, तर शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून अनेक ठिकाणी नाला सरळीकरण, खोलीकरण आदी कामे करण्यात आली होती ते प्रकल्प आजही कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे या भागात आज शेतीची मोठी बिकट अवस्था झालेली आहे. रिमझिम पावसामुळे थोडेफार गवत उगवले आहे. मात्र जमिनीत पुरेशी ओल नसल्याने तेही जळू लागले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे उसाच्या लागवडी ठप्प झालेल्या आहेत. पाऊस पडतोय कि नाही या विवंचनेत असलेला शेतकरी मात्र पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने समाधानी झाला आहे. तिथले पाणी उजनी येईल, उजनी धरण भरेल आणि आपल्या शेतीला हमखास पाणी मिळेल या आशेवर परिसरातील उस लागवडी थांबल्या आहेत.   अशा परिस्थितीत धरणातून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडणे गरजेचे आहे. पावसाळा अजून दोन महिने बाकी आहे आणि पुणे जिल्ह्यातील धरणे 70 - 75 टक्के भरलेली आहेत, अशा वेळी तिथे पडणार्‍या पावसाचे पाणी शेवटी उजनीतच येणार आहे, त्यामुळे उजनी धरणात आणखी पाणी येणार हे उघड आहे, असे असताना सद्य परिस्थितीत कालव्यातून पाणी सोडून शेतीला जीवनदान देण्याची गरज आहे. कालव्याला पाणी सोडल्यास शेतीसाठी आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न काही अंशी सुटणार आहे.