Wed, Jul 17, 2019 20:35होमपेज › Solapur › बेकायदेशीर हत्यार बाळगल्याने दोन वर्षे सक्‍तमजुरी

बेकायदेशीर हत्यार बाळगल्याने दोन वर्षे सक्‍तमजुरी

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 9:44PMसोलापूर : प्रतिनिधी

बेकायदेशीर देशी बनावट पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आरोपी  रोहित संपत मेरगू (वय 26, रा. श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ, अशोक चौक) यास जिल्हा न्यायाधीश एस.एस. जगताप यांनी दोन वर्षे सक्‍तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अमरुद्दीन मुजावर यांनी फिर्याद दिली होती.  रात्रगस्त घालत असताना घरकुल भागात एका घरात काहीजण लपले होते. संशयास्पद हालचालीवरुन पोलिसांनी छापा टाकला. पळून जात असताना मेरगूकडे बनावट पिस्तुल आणि चार राऊंड जिवंत काडतुसे सापडली. आरोपी पिट्टापल्लकडे कोयता, तर इतर तीन आरोपींकडे मिरचीची पूड मिळून आली होती. यात सरकार पक्षातर्फे 10  साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी मुजावर, पोकॉ सागर लांडे व तपासी अंमलदार बजरंग शामराव कापसे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पुरावा आणि साक्षी ग्राह्य धरुन न्यायालयाने दोन वर्षे सक्‍तमजुरी, एक हजार दंड व दंडाची रक्‍कम न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. यात पोहेकॉ शीतल साळवे यांनी कोर्टपैरवी म्हणून काम पाहिले.  सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आनंद गोरे, आरोपीतर्फे अ‍ॅड. श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले. 

1 लाख 80 हजारांची चोरी

शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी आणखी परत डोके वर काढले आहे. मुरारजी पेठेतील उमानगरीत घरफोडी झाली असून यात अज्ञात चोरट्याने रोख रक्‍कम, सोन्याचे दागिने अशा 42 हजारांवर डल्ला मारला आहे. किशोर गोविंदराव आकुड (वय 54, रा. उमानगरी) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात  फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी काढून बेडरुममधील कपाटातून रोख रक्‍कम, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.

बॅटर्‍यांची चोरी

मंगळवार बाजार येथील पत्रावाला कॉम्लेक्सच्या  टेरेसवर लावलेली 20 हजारांच्या बॅटरीची चोरी झाली. दीपक मच्छिंद्र गायकवाड (वय 35, रा. अमराई) यांनी  जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 30 जून ते 16 जुलै  याकालावधीत  टेरेसवरील शेल्टरमध्ये बसवलेली बॅटरी, शेल्टरचे कुलूप बनावट चावीचा वापर करुन उघडून बॅटरी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिसर्‍या घटनेत विजापूर नाक्याजवळील साहिल हॉटेललगत असलेल्या अ‍ॅसिड दुकानाचे गोडावून फोडून 1 लाख 55 हजार 200 रुपयांच्या 24 बॅटर्‍या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद जुबेर अब्दुलगनी सय्यद (वय 27, रा. चांदतारा मस्जिद) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल केली.