Sun, May 26, 2019 00:49होमपेज › Solapur › सोलापूर : अवैध दारु विक्री; पापरीच्या दोघांना पोलिस कोठडी

सोलापूर : अवैध दारु विक्री; पापरीच्या दोघांना पोलिस कोठडी

Published On: Sep 12 2018 11:07PM | Last Updated: Sep 12 2018 11:07PMमाहोळ : वार्ताहर

मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील अवैध दारु धंदे बंद करण्यासाठी रणरागिनींनी पुढाकार घेतला आहे. गावातील महिलांच्या तक्रारीनंतर मोहोळचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी दोन दारु विक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सीआरपीसी १५१(३) प्रमाणे कारवाई केली आहे. संतोष महादेव कोळी, रमेश अभिमान शेळके (रा.पापरी) अशी त्यांची नावे आहेत. मोहोळ न्यायालयाने त्यांना २४ सप्टेंबर पर्यंत तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संतोष महादेव कोळी, रमेश अभिमान शेळके (रा.पापरी) हे दोघे गावात चोरुन दारु विक्री करतात. त्यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ बिघडले असून तळीरामांचा महिला व मुलींना मोठ्या प्रमाणात त्रास होत असे. गावातील नागरीकांनी वरील दोघांना दारु विक्री करु नका म्हणून वेळोवेळी सांगितले होते. तसेच मोहोळ पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर प्रत्येकी दोन गुन्हे दाखल केले होते. मात्र तरीही त्याच्या वर्तणात कोणताच बदल झाला नाही. 

त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन पोलिस ठाण्यात धाव घेत अवैध दारु धंद्याच्या विरोधात नारी शक्तीचे दर्शन घडविले. त्यामुळे मोहोळ पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी त्यांना ताब्यात घेऊन सीआरपीसी १५१(३) नुसार अटक केली. १२ सप्टेंबर रोजी त्यांना मोहोळचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांनी त्यांना २४ सप्टेंबर पर्यंत तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले.

याबाबतची अधिक माहिती देताना मोहोळचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी या पुढील काळात कोणाताही सण उत्सव असो गावातील नागरीकांनी सहकार्य केल्यास अवैध दारु धंदेवाल्यांच्या जेलमध्ये बसवणार असल्याचे सांगितले. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सपोनि. इंद्रजित सोनकांबळे, स.फौ. सलीम शेख, पोलीस नाईक संतोष पाटेकर, पो.कॉ. प्रविण हिंगणवकर यांनी केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारु धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.