Wed, Apr 24, 2019 16:20होमपेज › Solapur › मोहोळमध्ये वाळू उपशावरून दोन गटात हाणामारी

मोहोळमध्ये वाळू उपशावरून दोन गटात हाणामारी

Published On: Jul 19 2018 7:06PM | Last Updated: Jul 19 2018 7:06PMमोहोळ : वार्ताहर

सीना नदीतून वाळू उपसा करण्याच्या कारणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी १८ जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजता मोहोळ तालुक्यातील आष्टे गावात घडली. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत दोन्ही गटातील एकुण १५ जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. आष्टे परिसरात जुंपलेल्या या भावकी युद्धामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दादाराव बापूराव मेलगे आणि धर्मा उत्तरेश्वर मेलगे यांच्यात भावकीचा वाद असून दादाराव मेलगे यांची शेतजमीन सीना नदीच्या काठावर आहे. या प्रकरणी पाहिल्या गटाचे दादाराव मेलगे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी १८ जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजता दादाराव मेलगे हे आष्टे येथील पंच चौकात थांबले होते. त्यावेळी धर्मा उत्तरेश्वर मेलगे, आण्णा उत्तरेश्वर मेलगे, उमेश भारत मेलगे, बाबुराव भारत मेलगे, रामदास भारत मेलगे, गणेश पंडीत मेलगे, आकाश हरिदास मेलगे, कुंडलिक सूर्यभान मेलगे, पंडित सुखदेव मेलगे (सर्व रा. आष्टे) हे त्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी दादाराव मेलगे यांना 'तुझ्या शेतातून सीना नदीतील वाळू का घेऊन जाऊ देत नाही' असे म्हणून लाकडाने बेदम मारण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण मिटवण्यासाठी आलेल्या विष्णु मेलगे आणि ज्ञानेश्वर मेलगे यांना देखील वरील लोकांनी बेदम मारहाण केली. यावेळी उमेश मेलगे याने विष्णू मेलगे यांच्याकडील दहा हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी वरील दहा जणांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसर्‍या गटाचे धर्मा उत्तरेश्वर मेलगे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता  ते आष्टे येथील पंचचौकात होते. त्यावेळी विष्णु अंकुश मेलगे,दादाराव बापूराव मेलगे, धनंजय विष्णू मेलगे, ज्ञानेश्वर विष्णू मेलगे, गोविंद चांगदेव जगताप सर्व (रा.आष्टे ता.मोहोळ) हे त्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी धर्मां यांना 'वाळू काढू नको म्हणणारा तू कोण ?' असे म्हणून काठीच्या साह्याने बेदम मारहाण केली. यावेळी वरील लोकांनी आकाश मेलगे यास बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील एक तोळा सोन्याची चैन काढून नेली. याप्रकरणी वरील पाच जणांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विक्रांत बोधे हे करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मोहोळ तालुक्यात बेकायदा वाळू उपसा करण्याच्या कारणाने वाळू तस्करांच्या गटात तुंबळ हाणामाऱ्या झाल्या आहेत. मात्र प्रत्येक गटाच्या मागे राजकीय गॉड फादर असल्यामुळे अशा लोकांवर जुजबी कारवाया होतात. त्यामुळे हे वाळू तस्करांना चांगलेच बळ मिळाले असून शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करायला देखील ते मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे अशा वाळू तस्करांवर तडीपारीची कारवाई करुन सीना काठची गुन्हेगारी कायमची मोडीत काढावी अशी मागणी तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांतून होत आहे.