Mon, Feb 18, 2019 01:20होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यात तूर चाळणीसाठी लाचेची मागणी

सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यात तूर चाळणीसाठी लाचेची मागणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या जिल्ह्यातच तूर चाळणी करुन जमा करुन घेण्यासाठी शेतकर्‍याकडून २ हजार ५०० रुपयांची लाच घेण्याचा प्रकार उघड झाला आहे.  याप्रकरणी अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लेखापालास व नाफेडच्या प्रतवारीकार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. 

राजशेखर श्रीमंत मुळे (वय ५५, रा. अक्कलकोट, सोलापूर) आणि विनायक अंबादास जाधव (वय २९, रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी २६ मार्च रोजी ६४ पाकिटे तूर अक्कलकोट कृषी बाजार समितीमधील शासनाच्या हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी दिली होती. त्यावेळी अक्कलकोट येथील वखार महामंडळ यांनी तक्रारदार शेतकरी यांची ३१ पाकिटे तूर खराब असल्याचे सांगून परत पाठविली. ती ३१ पाकिटे तूर चाळणी करुन परत वखार महामंडळाकडे पुन्हा पाठवून जमा करुन घेण्यासाठी तक्रारदार शेतकर्‍याकडून बाजार समितीचा लेखापाल राजशेखर मुळे याने २ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली. 

त्यामुळे तक्रारदार शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सापळा लावून अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सापळा लावून लेखापालमुळे याच्यासाठी नाफेडचा प्रतवारीकार जाधव याने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारकड तपास करीत आहेत.


  •