Fri, Jul 19, 2019 07:33होमपेज › Solapur › यमगरवाडी प्रकल्पास दोन कोटी देणार : मुख्यमंत्री

यमगरवाडी प्रकल्पास दोन कोटी देणार : मुख्यमंत्री

Published On: Feb 13 2018 10:30PM | Last Updated: Feb 13 2018 9:35PMतुळजापूर : प्रतिनिधी 

यमगरवाडी येथे भटक्या-विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठान निष्काम भावनेने करीत असलेले काम कौतुकास्पद आणि वंदनीय आहे. या सेवेची दखल घेऊन या संस्थांना राज्य सरकारच्या वतीने दोन कोटी रुपये मदत देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

यमगरवाडी येथील भटके-विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठान या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचा सांगता समारंभ महाशिवरात्रदिनी  मंगळवार, 13 रोजी येथील आश्रमशाळेच्या प्रागंणात झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी देशमुख, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रऋषी लाहिरी गुरुजी, भिकुजी इदाते, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुवर्णा रावळ, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, महादेव गायकवाड, कार्यवाह रावसाहेब कुलकर्णी, चंद्रकांत गडेकर, नरसिंग झरे आदींची उपस्थिती होती. 

या समारंभासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आ. सुजितसिंह ठाकूर, गिरीश प्रभुणे, गणेश जळके,  रोहन देशमुख, दत्ताजी कुलकर्णी, देवानंद रोचकरी, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, शहाजी पवार, गजानन वडणे, नागेश नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना भटक्या समाजामुळेच भारतीय संस्कृती टिकली असून येथील प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्या जिल्हाधिकारी यांनी माझ्याकडे त्वरित 
पाठवाव्यात. त्या मंजूर करुन देण्याबाबतीत मी जातीने लक्ष घालीन, असे आश्‍वासन दिले. या प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य सरकारच्यावतीने दोन कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा केली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी म्हणाले की, भटक्या समाजातील गोरगरीब मंडळींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. 

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी समाजातील शेवटच्या माणसाला मुख्य धारेत आणण्याचे काम या प्रकल्पाने केले आहे. भटक्या- विमुक्तांसाठी असणार्‍या योजना जोपर्यंत आपण त्यांच्याजवळ नेणार नाहीत तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. हे काम प्रतिष्ठान अत्यंत निष्काम भावनेने करत असल्याचे प्रतिपादन केले. भारतात सर्वात मोठी रोजगाराची आवश्यकता आहे. रोजगारामुळे गरिबी दूर होते. या संस्थेत शिकून विद्यार्थी स्वयंपूर्ण होत आहेत. ही संस्था करीत असलेल्या बहुमूल्य कामामुळे मी प्रभावित झालो असून तळागाळातील लोकांना जीवनाची दिशा दाखविण्याचे काम ही संस्था करीत असल्याने यासाठी जवाहारलाल स्पोर्ट ट्रस्टच्यावतीने पाच कोटी रुपयांचा मदत निधी संस्थेस जाहीर करीत असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
प्रास्तविक डॉ. सुवर्णा रावळ यांनी केले. सूत्रसंचलन आश्रमशाळेतील मुलींनी केले, तर आभार रावसाहेब कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमात राज्यातील भटके-विमुक्त समाजबांधव भाजप, संघ परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील सुमारे सहा हजार नागरिकांची उपस्थिती होती.