Sun, Apr 21, 2019 02:11होमपेज › Solapur › तुळजाभवानी देवीच्या निद्राकालास प्रारंभ 

तुळजाभवानी देवीच्या निद्राकालास प्रारंभ 

Published On: Dec 19 2017 2:06AM | Last Updated: Dec 18 2017 9:30PM

बुकमार्क करा

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजाभवानीमातेच्या प्रमुख उत्सवापैकी एक शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वी देवीच्या मंचकी निद्राकालास मार्गशीर्ष वद्य 30, शके 1939, सोमवार, 18 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला.

देवीचा निद्राकाल 26 डिसेंबरपर्यंत असून 26 रोजी दुपारी 12 वाजता शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या मुख्य यजमानांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.
सायंकाळी 6.15 वाजता पूजेचा घाट होऊन अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी शशीकांत पाटील यांच्यासह भोपे पुजारी, सेवेधारी उपस्थित होते. देवीच्या पंचामृत स्नान अभिषेकानंतर मानाच्या आरत्या पार पडल्या. त्यानंतर धार्मिक विधी पार पडून श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावरून उत्थापित करून सिंह गाभार्‍यालगत असलेल्या शेजघरातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आली.

या विधीने शाकंभरी नवरात्र महोत्सवपूर्व सात दिवसांच्या निद्राकालास प्रारंभ झाला. देवीचा हा निद्राकाल मोहनिद्रा म्हणून ओळखला जातो. यावेळी महंत तुकोजीबुवा, शशीकांत पाटील, भोपे पुजारीवृंद, मंदिर व्यवस्थापक, सेवेधारी, मंदिर कर्मचारी यांची उपस्थिती होती. तुळजाभवानीच्या या निद्राकालानंतर सोमवार, 25 च्या उत्तररात्री व मंगळवार, 26 च्या पहाटे देवीची पूर्ववत सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार असून मंगळवार, 26 रोजी दुपारी 12 वाजता शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या मुख्य यजमानांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.

देवीच्या मुख्य नवरात्र महोत्सवाप्रमाणे याही नवरात्र उत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येतात. पौष पौर्णिमेस घटोत्थापनेने या उत्सवाची सांगता होत आहे. पौष पौर्णिमेस छोटा दसरा म्हणून ओळखले जाते. या नवरात्र कालावधीत मोठ्या संख्येने भाविक भक्‍त तुळजाभवानी दर्शनाचा लाभ घेत असतात.