Tue, Sep 25, 2018 03:19



होमपेज › Solapur › तुळजाभवानीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा

तुळजाभवानीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा

Published On: Jan 02 2018 1:17AM | Last Updated: Jan 01 2018 11:13PM

बुकमार्क करा




तुळजापूर : देवीदास पाटील

तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सवात पौष शु. चतुर्दशी, सोमवार, 1 जानेवारी रोजी तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. हजारो भाविकांनी देवीचे महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा रूपातील संपूर्ण सृष्टीला त्रस्त करणार्‍या महिषासुर दैत्याचा वध करतानाच्या रूपाचे दर्शन घेतले.

सोमवारी सकाळी महंत तुकोजीबुवा यांनी मंदिर उघडल्यानंतर देवीची चरणतीर्थ पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर अभिषेकाची घाट झाल्यानंतर तुळजाभवानी देवीच्या पंचामृत अभिषेक पूजेस प्रारंभ झाला. यावेळी महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी विशाल कदम, अतुल मलबा, शिवाजी परमेश्‍वर, संजय सोंजी, विनोद सोंजी, सचिन परमेश्‍वर आदींची उपस्थिती होती. अभिषेक झाल्यानंतर धूपारती होऊन अंगारा काढण्यात आला.

पौष शु. चतुर्दशी, सोमवार, 1 रोजी तुळजाभवानीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. देवीस या अलंकार महापूजेत असुरराज महिषासुर दैत्याचा वध करतानाची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. यावेळी देवीला प्राचीन, पुरातन पारंपरिक जडजवाहिर दागदागिन्यांनी मढवण्यात आले. अमूल्य रत्न जडवलेले सुवर्ण नेत्र, नाकात मौल्यवान रत्नजडित नथ, भाळावर चंदन गंधाचा लेप असून त्यावर कुंकूमाचा मळवट भरण्यात आला होता. अनमोल किमती हिरे, माणिक, पाचू आदी रत्ने जडवलेला सुवर्ण मुकूट, गळ्यात विलोभनीय रत्नहार, पुरातनकालीन सुवर्ण पुतळ्यांच्या माळा, विविध मोतीमाळा परिधान केलेले देवीचे महिषासुरमर्दिनीचे विक्राळ उग्ररूप दिसत होते. यावेळी देवीला पिवळसर केशरी रंगातील फिकट हिरव्या काठपदराचा किमती शालू नेसविण्यात आला होता. महिषासुरमर्दिनी अलंकार रूपातील देवी असुरराज महिषासुराच्या त्रासाने भयकंपित झालेल्या सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या छळाने संत्रस्त झालेल्या स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक भयमुक्‍त करण्यासाठी महिषासुराशी नऊ दिवस, नऊ रात्री घनघोर तुंबळ युद्ध केले. या नऊ दिवसांच्या प्रचंड युद्धानंतर देवीने महिषासुराचा संहार केला. तीनही लोकांना त्राहीमाम करून सोडलेल्या दैत्यराज महिषासुराचा वध करून देवीने सर्वांना भयमुक्‍त केले. या तुंबळ युद्धाचा देखावा महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा रुपातून मांडण्यात आला. यात देवीच्या उजव्या बाजूस तिचे वाहन सिंह असून त्याने महिषासुराचे वाहन असलेल्या रेड्यास ठार केले आहे. देवीने प्रचंड उग्र रुप धारण करून कोपायमान होत लाल नेत्र विस्फारले आहेत. अत्यंत त्वेषाने देवीने महिषासुराच्या छातीमध्ये त्रिशूळ खुपसला असून दैत्यराज महिषासुर धरणीवर पडत आहे, असा भयचकित करणारी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.

हजारो भाविक भक्‍तांनी देवीच्या उग्ररुपातील महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजेचे भक्तीभावाने दर्शन घेतले.