Thu, May 28, 2020 12:45होमपेज › Solapur › भक्‍तिभावात जलयात्रा उत्सव मिरवणूक

भक्‍तिभावात जलयात्रा उत्सव मिरवणूक

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 11:19PM

बुकमार्क करा
तुळजापूर : देविदास पाटील

तुळजाभवानी मातेच्या प्रमुख उत्सवांपैकी दुसर्‍या क्रमांकाचा उत्सव असणार्‍या शाकंभरी नवरात्र उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलयात्रा उत्सव मिरवणूक अत्यंत भक्‍तिभावाने आणि हर्षोल्हासित वातावरणात झाली.

पापनाश तीर्थापासून प्रारंभ झालेल्या या उत्सव मिरवणुकीत महंत तुकोजीबुवा, मुख्य यजमान अजित कदम, मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार सुनील पवार, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर कदम आणि पदाधिकारी, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे विपीन शिंदे व सदस्य पदाधिकारी, उपाध्ये मंडळाचे अनंतराव कोंडो व पदाधिकारी, तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे विशाल रोचकरी आणि सहकारी, भोपे, पुजारी, सेवेकरी, मंदिर संस्थान कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांसह भाविक भक्‍त हजारोंच्या संख्येने सहभागी होते.

सकाळी साडेसहाच्या सुमारास पापनाश तीर्थ येथील इंद्रवरदायिनी कुंडातील पवित्र जल जलकुंभात भरून घेऊन मुख्य यजमानांसह हजारो कुमारिका, सुवासिनींनी तुळजाभवानी मंदिराकडे प्रस्थान केले. यावेळी हळदी-कुंकुवाच्या उधळणीत ‘आई राजा उदो उदो’च्या भक्‍तिमय उद्घोषात संपूर्ण वातावरण भक्‍तिमय झाले होते.

या जलयात्रेत सहभागी झालेल्या कुमारिका, सुवासिनींना प्रक्षाळ मंडळाच्या वतीने जलकुंभ वितरित करण्यात आले होते.मिरवणुकीच्या अग्रभागी मुख्य यजमान अजित कदम आणि त्यांची पत्नी जयश्री हे जलकुंभ घेऊन चालत होते.

या हर्षोल्हासित उत्सव मिरवणुकीत आराधी, गोंधळी, वारुवाले, पोतराज, वासुदेव आपल्या पारंपरिक वेषभूषेत सहभागी झाले होते.संभळाचा कडकडाट, वारुवाल्यांची भंडार्‍याची उधळण, झांजेच्या तालावर मनाला ताल धरायला लावणारी पारंपरिक आराधी गाणी, भजनी मंडळे यांनी उत्सव मिरवणूक दिमाखदार झाली. हातावर परसराम खेळवत आराधी गीते गात, फुगड्या खेळत आराधी महिला तल्लीन झाल्या होत्या. 

मिरवणुकीत बैलगाडीत पारंपरिक चौघडा वादन करणारे वादक बसले होते. शिवकालीन वेषभूषेतील अश्‍वारूढ मावळे लक्ष वेधून घेत होते.

पापनाश तीर्थापासून सुरु झालेली जलयात्रा उत्सव मिरवणूक शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर चौक, भवानी रोडमार्गे तुळजाभवानी मंदिरात दाखल झाली. तब्बल चार ते पाच तास चाललेल्या मिरवणुकीची तुळजाभवानी मंदिरात सांगता झाली. मंदिरातील अभिषेक झाल्यानंतर इंद्रवरदायिनी कुंडातील हजारो कुमारिका, सुवासिनींनी आणलेल्या पवित्र जलाने देवीच्या गाभार्‍याचे प्रक्षालन करण्यात आले. जलयात्रेनंतर देवीच्या, नित्योपचार पंचामृत अभिषेक पूजाविधी झाले. त्यानंतर जलयात्रा उत्सव मिरवणुकीत सहभागी झालेल्या कुमारिका, सुवासिनींची मंदिर प्रशासनाच्या वतीने खण नारळाने ओटी भरण्यात आली.

तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भवानी रोड नजिकच्या भाई मंडई येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.  यासाठी प्रक्षाळ मंडळाचे विशाल रोचकरी यांच्यासह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.