अकलूज : रवी शिरढोणे
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे बुधवारी (दि. 18) सोलापूर जिल्ह्यात अकलूज (ता. माळशिरस) येथे सकाळी आगमन होत आहे. त्या निमित्ताने लाखो वैष्णवांसह तुकोबारायांच्या स्वागतासाठी अकलूजनगरी सज्ज झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील सराटी येथील शेवटचा मुक्काम आटोपून बुधवारी (दि. 18) पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात सकाळी प्रवेश होत आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यांची सीमा असणार्या नीरा नदीच्या पात्रात सकाळी 6 वाजता पालखीचे पादुका स्नान होऊन पालखी सोहळा नीरा नदी पूल ओलांडून अकलूज (ता. माळशिरस) येथे आगमन करत आहे.
सराटी व अकलूज हे अंतर केवळ चार कि.मी. असल्याने व अकलूज येथे मुक्कामाच्या सुविधा उपलब्ध असल्याने आधल्या दिवशीच असंख्य वैष्णव अकलूज मुक्कामी येतात. त्यामुळे अकलूजकरांवर दोन दिवसांच्या मुक्कामाची जबाबदारी असते. सराटी पुलावर पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, आ.हनुमंतराव डोळस, प्रांताधिकारी शमा पवार, पं.स.सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, तहसीलदार बाई माने आदी उपस्थित राहणार आहेत. पालखी सोहळ्याचे स्वागत सकाळी 8 वाजता होत आहे. तर 9 वाजता अकलूजच्या गांधी चौकात अकलूज ग्रामपंचायतीच्यावतीने खा.विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जि.प.सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, उपसरपंच धनंजयभाऊ देशमुख, माजी सरपंच किशोरसिंह माने- पाटील, सर्व आजी माजी सदस्य, ग्रामस्थांच्यावतीने हे सोहळ्याचे स्वागत करणार आहेत.
10 वाजता सदाशिवराव माने विद्यालय येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने पालखीचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, सुलक्षणादेवी मोहिते-पाटील, सदस्य संग्रामसिंह मोहिते-पाटील, जि.प.सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे व सर्व सदस्यांच्यावतीने होत आहे.
स्वागतानंतर स.मा.वि.मैदानावर पालखीचा गोल रिंगण सोहळा होत असून लाखों भाविकांना हा नयनरम्य सोहळा अनुभवता यावा, यासाठी नियोजन व्यवस्था करण्यात आली आहे. अकलूजकरांनी वैष्णवांच्या सुविधेसाठी परिसरातील शाळा, मंदिरे, समाज मंदिरे, मंगल कार्यालये, विविध संस्थांची कार्यालये सर्व सुविधायुक्त उपलब्ध करून दिली आहेत.