Fri, Apr 26, 2019 15:46होमपेज › Solapur › पाथरी लघुप्रकल्पाच्या भरावावरील झाडे काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

पाथरी लघुप्रकल्पाच्या भरावावरील झाडे काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 9:32PM बार्शी : तालुका प्रतिनिधी 

अखेर पाथरी (ता. बार्शी) येथील त्या ब्रिटिशकालीन लघुप्रकल्पाच्या भरावावरील झाडे काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ब्रिटिशकाळात तत्कालीन दुष्काळी परिस्थितीत तयार करण्यात आलेल्या व बार्शी तालुक्याच्या पूर्व भागातील शेती व ग्रामस्थांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा लघुप्रकल्प असलेल्या पाथरी (ता. बार्शी) येथील तलावाच्या भरावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची वाढ झाल्यामुळे व संबंधित विभागाकडून वृक्षाची खबरदारी घेतली जात नसल्यामुळे लघुप्रकल्पाच्या भरावास भेगा पडण्यास सुरूवात झाली असल्याबाबत नुकतेच दै. ‘पुढारी’मध्ये वस्तुस्थितीदर्शक वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

भरावावर मोठमोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन तोडून घेण्याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार संबंधितांनी तातडीने कामकाजास सुरूवात केली होती. झाडे काढण्याचे काम सुरू होऊन ते अंतिम टप्प्यात आल्यामुळे या भागातील शेतकरी व जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बार्शीच्या पूर्व भागातील बालाघाट डोंगर रांगामधील डोंगरी व जंगली भागातील पाणी वाहून न जाता ते अडवण्यासाठी तसेच येथील जनतेच्या शेतीला लाभदायक ठरावे यासाठी  तत्कालीन इंग्रज शासनाने हा प्रकल्प  उभा केला होता.  सन 1909 मध्ये पूर्ण झाला होता. पाथरी लघुप्रकल्पाच्या निर्मितीला  108 वर्ष पूर्ण झाले आहेत. तो प्रकल्प  आजही सुस्थितीत आहे. या ब्रिटिशकालीन प्रकल्पाच्या भरावावर मोठमोठे वृक्ष वाढल्यामुळे भरावावर मोठ्या भेगा पडू लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. पाथरी तलावावर बाभळ, लिंब आदी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची मोठी वाढ झाली होती तसेच लक्षणीय बाब ही की, तलावाच्या भरावाच्या वरच्या पृष्ठभागावर फट पडल्याचेही निदर्शनास  आले होते. त्यामुळे शेतकर्‍यांमधून चिंतेचे वातावरण तयार झाले होते.