Wed, Apr 24, 2019 11:48होमपेज › Solapur › सोलापुरात 30 कोटींची उलाढाल ठप्प

सोलापुरात 30 कोटींची उलाढाल ठप्प

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 20 2018 11:07PMसोलापूर : प्रतिनिधी

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसद्वारा माल वाहतूकदारांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे देशातील ट्रक मालक-चालकांनी चक्काजाम आंदोलन करत वाहतूक बंद केली आहे. डिझेलचे वाढते दर, जीएसटी, थर्ड पार्टी इन्शुरन्स यासह अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे 25 ते 30 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांची मात्र उपासमार होत असून  ड्रायव्हर, क्‍लिनर, हमाल यांची रोजंदारी बुडत आहे.

माल वाहतूदारांच्या या संपामुळे सोलापुरातील जवळपास 250 बुकिंग ऑफीस व  कमिशन  एजंट यांची  कार्यालये बंद असल्याची माहिती सोलापूर गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी दिली. प्रकाश औसेकर व यशवंत साळुखे यांनी सांगितले की, विविध प्रकारचे 14 ते 16 कर भरावे लागत आहेत. त्यात टोल व 18 टक्के जीएसटीची भर पडली असून व्यवसाय करणे अवघड झाल आहे.

माल वाहतूकदारांच्या संपामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील माल वाहतूक ठप्प झाली आहे. सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने घेतली आहे.  सोलापूर शहरातून परराज्यांत जाणारी माल वाहतूक शुक्रवारी पूर्णपणे थांबली होती. शहरालगतच मोठ्या तीन सिमेंट कंपन्या व दोन  एमआयडीसी आहेत. माल वाहतूकदारांच्या संपामुळे  उत्पादित झालेला माल कंपन्यांतून बाहेर पडलेला नाही.

डिझेलच्या किंमती कमी होणे गरजेचे आहे. कारण ट्रकचे भाडे व डिझेलच्या किंमती यांचे गणित बिघडले आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी टोलची मुदत संपली असतानाही टोल वसुली सुरूच आहे. ट्रकधारकांना इन्शुरन्स (विमा) काढणे सक्तीचे आहे. परंतु थर्ड पार्टी विमा उतरविणे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. 

एका ट्रकला जवळपास 44 हजार रुपये वार्षिक  खर्च फक्‍त  विमा  उतरवण्यासाठी  होत आहे. एवढी गलेलठ्ठ रक्‍कम आकारू नये. ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील टीडीएस समाप्त होणे गरजेचे आहे. डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी (डीपीडी)  योजना संपविणे गरजेचे आहे. अशा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.