Sun, Feb 23, 2020 10:57होमपेज › Solapur › नियम धाब्यावर बसवून पंढरीत वाहतूक

नियम धाब्यावर बसवून पंढरीत वाहतूक

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 9:15PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची निष्क्रियता, राजकीय नेत्यांचा दबाव आणि उद्धट वाहनधारक, वाहनचालकांची दमदाटी या सगळ्या प्रकारामुळे पंढरपूर शहर वाहतूक शाखेतील अधिकार्‍यांपासून ते कर्मचारीसुद्धा हतबल झालेले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सुचनांना केराची टोपली दाखवून पंढरपूर नगरपालिका सुस्त बसत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर कसलाच इलाज चालत नसल्याची हतबलता एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने बोलून दाखवली. 

पंढरपूर शहरात वरचेवर वाहतुकीची कोंडी वाढत आहे. स्थानिक वाहनांबरोबरच बाहेरून येणार्‍या वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांना शहरात पुरेशा प्रमाणात पार्किंगची जागा उपलब्ध नाही. ज्या जागा आहेत त्याठिकाणी ही वाहने लावली जात नाहीत. त्याकरिता पालिका आणि वाहतूक शाखेने मिळून जे प्रयत्न करणे अपेक्षीत आहेत ते केले जात नाहीत. त्यामुळे शहरात जागो-जागी कुठेही कसलीही हलकी आणि जड, अवजड वाहने उभी केलेली दिसून येतात.यामुळे शहरातून मोटारसायकलवरून फिरणेही तारेवरची कसरत ठरू लागले आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेकडे नेहमीच बोट दाखवले जात असले तरी पंढरपूर नगरपालिका प्रशासन, राजकीय नेते मंडळी, वाहनधारक आणि वाहनचालकही तेवढेच जबाबदार असल्याचे निष्पन्न झालेले आहे.  पंढरपूर शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. ही अतिक्रमणे हटवणे नगरपालिकेचे काम आहे. परंतु पालिका अतिक्रमण विरोधी पथक बेपत्ता असते. त्यामुळे शहरात दररोज अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. या वाढत्या अतिक्रमणामध्ये दिवसा ढवळ्या जिल्हाधिकार्‍यांचा मनाई आदेश डावलून घुसणारी अवजड वाहने आणखी भर घालत आहेत. शहरातील व्यापार्‍यांनी दिवसा अशी वाहने शहरात आणू नयेत अशा सूचना असताना राजरोसपणे ही वाहने व्यापारी घेऊन येतात. त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर राजकीय नेत्यांकडून दबाव येतो आणि पोलिस कर्मचार्‍यांना मुकाट रहावे लागते असे पंढरीतील अनुभव आहेत. शहरात जड वाहने येऊ नयेत याकरिता प्रमुख मार्गावर बॅरेकेटिंग केले आहेत. हाईट गेज बसवले होते. मात्र हे बॅरेगेटिंग काढून, हाईट गेज तोडून वाहने शहरात घुसत आहेत.  पंढरपूर-वेणेगाव मार्गे येणार्‍या वाहनांना जुना नाका येथून बायपास मार्गे वळवण्यात आलेले असले तरी जड वाहतूक करणारी वाहने त्याठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून, त्यांच्यावर राजकीय दबाव आणून वाहने दामटून सरगम रेल्वे पुलाखालून शहरात घेऊन येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस उग्र बनत आहे. राजकीय नेत्यांचा दबाव बाजूला सारून नगरपालिका आणि शहर वाहतूक शाखेने योग्य ती कारवाई केल्याशिवाय या वाहतूक कोंडीला आळा बसणार नाही, असेही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.