Mon, Mar 25, 2019 09:55होमपेज › Solapur › आम्ही सोलापूरकर नियम मोडतो?

आम्ही सोलापूरकर नियम मोडतो?

Published On: Feb 22 2018 10:26PM | Last Updated: Feb 22 2018 9:47PMसोलापूर ः इरफान शेख

शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी सातत्याने ट्रॅफिक जॅमचे दृश्य पाहायला मिळते. विशेषतः शिवाजी चौक, सात रस्ता, मंगळवार बाजार, सरस्वती चौक, डफरीन चौक, भैय्या चौक, नवी पेठ आदी  परिसरांत वाहतूक पोलिस उभे असतानादेखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. शहरातील सर्व भागांत व चौकांत  वाहतूक कोंडी होते. परंतु त्याला फक्‍त प्रशासन नव्हे तर आपण नागरिकदेखील तेवढेच जबाबदार आहोत. आपणामध्ये शिस्त नावाची संकल्पना लयास गेली आहे. प्रत्येक सोलापूरकर नियमांची पायमल्ली करताना आढळत आहे. नागरिकांमध्ये कायद्याचा धाकच राहिला नाही. दुचाकी वाहनधारकांपासून ते चारचाकी वाहनधारकांपर्यंत सर्वांना घाई असते. या घाईगडबडीत वाहनधारक शासकीय नियम व वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून  पुढे जाण्यात मग्न असतात. स्वत:मुळे झालेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येचा दोष प्रशासनास द्यायचा ही सवयच झाली आहे. त्यामुळेच की काय सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीला जसा यंत्रणेला दोष दिला जात आहे तशाच पध्दतीने येथील वाहनधारकांना पर्यायाने जनतेला दोष दिला तर नवल वाटायला नको?

ट्रिपल सीट दुचाकीधारकांची संख्या वाढली

सोलापूर शहरात दुचाकीवरुन ट्रिपल सीट वाहतूक करताना वाहनधारकांची संख्या वाढली आहे. नियमाप्रमाणे एखाद्या दुचाकी वाहनावर दोनजणांनाच प्रवास  करता येऊ शकतो. महाविद्यालयीन तरुण-तरुणी हे ट्रिपल सीट फिरताना दिसतात. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडतानादेखील पालक तीन ते चार शालेय विद्यार्थ्यांना दुचाकीवर बसवून वाहने हाकताना दिसतात. पालकांच्या या बेशिस्तपणामुळे त्यांच्याच पाल्यांचा जीव धोक्यात आहे, हे कोण सांगणार?

बाईक राईडरचे वाढते प्रमाण

शहरात बाईक राईडर ही संकल्पना नव्याने उदयास आली आहे. एखाद्या सिनेमात ज्याप्रमाणे सुसाट वाहने हाकली जातात तशीच वाहने शहरातून काही टवाळके हाकताना दिसतात. पल्सर, यामाहा, बुलेेट यासारख्या वाहनांच्या आवाजात  बदल करुन जोरजोरात हॉर्न वाजवित सुसाट वेगात  टवाळकी पोरे पाहावयास मिळतात. वाहतूक पोलिसांच्या तावडीतदेखील सापडत नाहीत.

वाहने चालविताना मोबाईलवर बोलणे 

शहरातील अनेक नागरिक वाहने चालविताना मोबाईलवर बोलताना आढळतात. ज्यामुळे एकप्रकारच्या अपघाताला निमंत्रणच आहे. वाहतूक पोलिसांच्यासमोर कधी हा प्रकार आढळला तर लगेच दंड भरावा लागतो. अनेक नागरिक शहराच्या मध्यवर्ती चौकातून जाताना मोबाईलवर बोलत वाहने हाकत असतात. वाहतुकीची नियमावली आपणच पायदळी तुडवली तर प्रशासनास दोष देणे योग्य नव्हे.