पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर शहरात जड वाहतुकीस बंदी घातलेली असतानाही व्यापार्यांच्या मनमानीपणामुळे जड वाहतूक अनावर झाली असून वाहतूक नियंत्रण शाखाही या जड वाहतुकीपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे.
पंढरपूर शहरात दररोज भाविकांच्या वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यातच स्थानिकांची वाहने, दुकानदारांनी अतिक्रमणे केल्यामुळे अरूंद झालेले रस्ते, रस्त्यांची सुरू असलेली कामे यामुळे शहरात सध्या कोणत्याही रस्त्यावर गेले असता वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. शहराच्या सर्व बाजूने येणार्या रस्त्यांवर, शहरातील चौकात जागोजागी वाहतूक खोळंबलेली दिसून येते. वाहतुकीमुळे रस्ता अडलेला नाही असा एकही रस्ता, एकही चौक, एकही भाग पंढरपूर शहरात दिसत नाही. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पंढरपूर नगरपालिका आणि वाहतूक नियंत्रण शाखा यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र यासंदर्भात एकमेकांवर टोलवा-टोलवी करून दोन्ही विभाग मोकळे होत आहेत आणि हाल मात्र सामान्य नागरिकांना सोसावे लागत आहेत.
पंढरपूर शहारात दिवसा जड वाहने घेऊन येण्यास जिल्हाधिकार्यांनीच मनाई आदेश काढलेला असताना गबरगंड व्यापारी आपली अजस्त्र वाहने शहरात दिवसाही घेऊन येतात आणि माल खाली करेपर्यंत तासन्तास रस्ते अडवून ठेवतात. सायंकाळी 7 वाजल्यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत जड वाहने शहरात आणून खाली केली तरी वाहतुकीस अडथळा होणार नाही. परंतु सकाळी 10 वाजल्यानंतर बहुतांश वेळा 8 ते 16 चाकी जड वाहने शहरात येतात आणि रस्ता अडवून बीनधास्त उभा असतात.
यासंदर्भात वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी अनेकवेळा व्यापार्यांना दंडात्मक कारवाई केली. वाहनधारकांवरही कारवाई केली मात्र तरीही जड वाहतूक शहरात येतच आहे. यावर नगरपालिका आणि वाहतूक शाखेने कायमस्वरूपी उपाययोजना करून त्यावर कठोर अंमलबजावणी करण्याची व्यक्त होत आहे.