Fri, May 24, 2019 20:41होमपेज › Solapur › गोविंदपुरातील नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड त्रास

गोविंदपुरातील नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड त्रास

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 10:22PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

शहरातील अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण यादरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे नवीन पुलावरून येणारी वाहतूक गोविंदपुरामार्गे शहरात वळवण्यात आली आहे. त्यामुळे गोविंदपुरा भागातील नागरिक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी तसेच चारचाकी वाहने या भागात सोडली जाऊ नयेत, अशी मागणी या भागातील रहिवासी करू लागले आहेत. 

अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याचे रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सोलापूरकडून नवीन पूल तसेच दगडी पुलावरून येणारी चारचाकी, दुचाकीची वाहतूक अंबाबाई पटांगण येथील सातारकर वाड्यापासून गोविंदपुरामार्गे शहरात येत आहे. याठिकाणी मुळामध्ये गोविंदपुरापासून खिस्ते गल्ली ते  नंदगोपाल मंदिरापर्यंतचा रस्ता प्रचंड अरूंद आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहे. याच रस्त्याने येणारे भाविक थेट चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल मंदिराकडे जातात. त्यामुळे हा रस्ता तसाही कायम रहदारीचा असतो. या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याच्या रुदीकरण कामासाठी या मार्गाने होणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र तरीही या रस्त्याने चारचाकी वाहने, यामध्ये मोठ्या जीप, ट्रॅव्हल्स  बसेस, टमटम, रिक्षा आदी मोठ्या संख्येने येत आहेत. येथील सातारकर वाडा, चवरे वाड्यापासून गोविंदपुरा भागातून खिस्ते गल्ली ते नंदगोपाळ मंदिरमार्गे तांबडा मारुती, विप्र दत्त घाट, प्रदक्षिणा मार्ग, महाद्वाराकडे ही वाहने जात असतात. त्याचबरोबर शेकडो मोटारसायकलसुद्धा याच रस्त्यावरून जात असतात. परिणामी गोविंदपुरा, खिस्ते गल्ली भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे  वाहनचालक आणि नागरिकांमध्ये हमरीतुमरी, वादावादी सातत्याने होत असते. 

या भागात दाट नागरी वस्ती असल्यामुळे वाहनांच्या गोंधळ, गोंगाटामुळे नागरिकांची रात्रीची झोपही उडाली आहे. चौकाचौकांत वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांमध्ये हाणामार्‍यांचे प्रसंग उद्भवत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गोविंदपुरामार्गे येणारी चारचाकी वाहने पूर्णपणे बंद करण्यात यावीत किंवा एकेरी मार्ग सुरू करावा. पर्यायी मार्ग म्हणून अंबाबाई पटांगण, सामान्य रुग्णालय, झेंडे गल्लीमार्गे अर्बन बँक चारचाकी वाहने वळवण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.  या रस्त्याचे काम तीन ते चार महिन्यांत पूर्ण होणार नाही. 

त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीमुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच वाहतूक शाखा व  नगरपालिकेने या मार्गावरील वाहतूक बंद करणे गरजेचे आहे.