करमाळा : तालुका प्रतिनिधी
एका व्यापार्याने साडेतीन लाख रुपयांचे 8 हजार 800 किलो डाळिंब घेऊन पैसे न देता पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका डाळिंब व्यापार्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास एकनाथ साळवे (रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत या डाळिंब व्यापार्याविरूद्ध करमाळा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक केम (ता. करमाळा) येथे 2 व 3 जानेवारी दरम्यान घडली आहे. याप्रकरणी प्रताप नरसिंह काळे ( रा. सुर्ली, ता. माढा, जिल्हा सोलापूर) या शेतकर्याने फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काळे यांची केम हद्दीत दहा एकर शेती आहे. त्यामध्ये सहा एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली होती. तर 18 नोव्हेंबर 2017 ते 3 डिसेंबर या दरम्यान संशयित आरोपी विलास साळवे याने काळे यांच्या शेतातून 725 कॅरेट डाळिंब घेऊन गेला होता, त्यावेळी 3 लाख 29 हजार रुपये रक्कम झाली होती. त्यापैकी 3 लाख 14 हजार रुपये चेकच्या माध्यमातून काळे यांना देऊन विश्वास संपादन केला होता. त्यानंतर 2 जानेवारी 2018 ते 3 जानेवारी दरम्यान काळे यांच्या शेतातील उर्वरित 440 कॅरेट डाळिंब जवळपास 8800 किलो असल्याने त्याची रक्कम 3 लाख 52 हजार रुपयाचा डाळिंबाचा माल साळवे यांनी टेंपो (क्रमांक यु. पी. 40 टी. 0476) मध्ये भरून घेऊन गेला व नंतर पैसे देतो म्हणून गेला.
त्यानंतर मोबाईलवर फोन करून पैसे खात्यावर पाठवतो म्हणाला तरी आजतागायत एक रुपयाही जमा न केल्याने एकनाथ साळवे यांनी साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार प्रताप काळे यांनी करमाळा पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित चौधरी, हनुमंत माने करीत आहेत.