Mon, Aug 19, 2019 01:28होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांच्या दारात तूर फेकून निषेध

सहकारमंत्र्यांच्या दारात तूर फेकून निषेध

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:54PMसोलापूर ः प्रतिनिधी

प्रहार संघटना शहर शाखेच्या वतीने सहकारमंत्र्यांच्या राहत्या घरासमोरील दारासमोर तूर फेकून निषेध व्यक्‍त करण्यात आला. पोलिसांनी ताबडतोब आंदोलकांना ताब्यात घेऊन विजापूर नाका पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलकांनी  पोलिसांकडून  दडपशाही केली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानासमोर जमा झाले व सहकारमंत्र्यांविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. तूर खरेदी न करता शासनाकडून शेतकर्‍यांची पिळवणूक होत असल्याच्या घोषणा दिल्या. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी व जमीर शेख यांच्याकडे होते.

पोलिसांना याबाबत काहीही कल्पना नसल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. समोर असणार्‍या औद्योगिक पोलिस चौकीतून दोन पोलिस कर्मचारी पळत आले व आंदोलकांना ताब्यात घेतले. तोपर्यंत प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी सहकारमंत्र्यांच्या दारासमोर तूर फेकून निषेध व्यक्‍त केला होता.

प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी म्हणाले की, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकर्‍यांनी आपली तूर शासनास विकण्यासाठी नोंदणी केली. परंतु, तुरीची 15 मेपर्यंत खरेदी करण्याचे आदेश मार्केटिंग कमिटीला दिल्याबाबत शासन वल्गना करत असले, तरी अद्यापपर्यंत हमीभाव केंद्रापर्यंत पोहोचला नाही. त्याचबरोबर  सलग  चार सुट्ट्या असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. ही एकप्रकारे शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर 12 हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी तुरीची नोंदणी केली आहे. परंतु, प्रत्यक्षात साडेपाच हजार शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने शेतकर्‍यांची तूर तातडीने खरेदी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनात अजित कुलकर्णी, जमीर शेख, सलीम मुजावर, अनिकेत भूमकर, शेकू कांबळे, एम. शेतसंदी, मुजम्मील हुंडेकरी, सत्यवान खालकर, मौला नदाफ, बंडू शिंदे, इब्राहिम जमादार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.