Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Solapur › आज सोलापूर बंद; महाराष्ट्रभरच्या धगीमुळे चिंता

आज सोलापूर बंद; महाराष्ट्रभरच्या धगीमुळे चिंता

Published On: Jul 30 2018 1:33AM | Last Updated: Jul 29 2018 10:54PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ठोक मोर्चा आंदोलन सुरू झालेले आहे. यंदाच्या मराठा मोर्चांनी राज्यात उग्ररुप धारण केले आहे. परंतु पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरातील मराठा समाजाने वारकर्‍यांना आंदोलनाचा त्रास होऊ नये म्हणून आंदोलन उशीराने सुरू केले. 

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने गेल्या दोन दिवसांत तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने नुकतेच मंत्र्यांच्या घरासमोर आसूड मार आंदोलन केले. तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी श्री रुपाभवानी मंदिरात जागरण गोंधळ आंदोलन केले. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांनी सोमवार, 30 जुलै रोजी सोलापूर बंद पुकारले आहे. महाराष्ट्रात पेटलेले आंदोलन पाहता सोलापूर बंदची धग चिंता वाढवणारीच आहे.

सोलापूरचा इतिहास तसा दंगलींचाच आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांत सोलापूरने दंगलीची प्रतिमा पुसून काढली आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाने महाराष्ट्रात उग्ररूप धारण केले असल्याने सोलापूर बंदच्या पार्श्‍वभूमीवर जाणकार चिंता व्यक्त करीत आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्याच्या पोलिसांची बंदच्या पार्श्‍वभूमीवर कसोटी लागणार आहे. सोलापूर शहरातील अनेक व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सोमवारी सोलापूर कडकडीत बंद राहण्याची शक्यता आहे. मराठा समाजाने जीवनावश्यक सेवा बंदमधून वगळल्या असल्याने दिलासा आहे. मराठा समाजाच्या युवकांनी आपल्या कुटुंबांचे भान ठेवून आंदोलन करण्याची गरज आहे. 

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समन्वयाने सोलापूर बंद सुरळीत पार पडण्यासाठी सतर्कता आहे. मराठा समाजाच्या मागण्या शासनाने तातडीने सोडवून राज्यभरात असलेली अस्थिरता संपुष्टात आणण्याची गरज आहे. अन्यथा अशा आंदोलनाचा परिणाम राज्याच्या विकासावर होणार आहे.

एस.टी. सेवा देखील राहणार बंदच!
मराठा आरक्षणाच्या बंदमुळे संवेदनशिल मार्गावर एस.टी. सेवा देखील बंदच राहणार आहे. तर ज्याठिकाणी पोलिस बंदोबस्त भरपूर असेल, त्याठिकाणी एस.टी. सेवा देण्यात येणार आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळाचे नुकसान होऊ नये या अनुषंगाने खबरदारीचे उपाय म्हणून एस.टी. सेवा बंद राहणार आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे.राज्यभरात या आंदोलकांचे मुख्य टारगेट म्हणजे एस.टी. बसेस आहेत. आषाढी  यात्रेच्या  काळात  आंदोलनाची सुरुवात झाली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे या तरुणाच्या जलसमाधीमुळे आंदोलन चिघळले. आंदोलकांनी राज्यभरात एस.टी. बसेसच्या काचा फोडल्या. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. 21 जुलै रोजी सोलापूर ते बार्शी  महामार्गावर मराठा आरक्षणाच्या  आंदोलकांनी एस.टी. बस पेटवून दिली. असे मिळून सोलापुरात 148 बसेस फोडल्या गेल्या आहेत. अजून हा आकडा वाढू शकतो.
राज्य परिवहन महामंडळाने सोलापूर-बार्शी, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-मंगळवेढा, सोलापूर-सांगोला या मार्गावरील एस.टी. वाहतूक पूर्णत: बंद केली आहे.

शनिवारी सोलापूर-पुणे या महामार्गावरील एसटी बससेवा आठ तास बंद होती. प्रवाशांच्या जिवीतास धोका होऊ शकतो. त्याअनुषंगाने एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.

एखाद्या एस.टी. बसची काच फोडल्यास फक्त काचेचे नुकसान झाले  असे नाही, तर काच फोडल्यामुळे जितके दिवस ती गाडी रिपेअरींगसाठी थांबेल तितक्या दिवसाचा महसूल बुडेल, तो देखील नुकसानग्राह्य धरला जातो. आजतागायत 325 ते 350 एस.टी. बसेस फोडल्या आहेत. सुमारे 15 ते 20 कोटींचा राज्य परिवहन महामंडळाचा महसूल बुडाला आहे.
सोलापूर विभागात 148 बसेस फोडण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी संवेदनशिल मार्गावर एस.टी. सेवा खंडित केली आहे.