Tue, Apr 23, 2019 21:52होमपेज › Solapur › मुख्याध्यापकांना तंबाखूमुक्‍तीची शपथ अंतरमुख करावयास लावणारी

मुख्याध्यापकांना तंबाखूमुक्‍तीची शपथ अंतरमुख करावयास लावणारी

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 8:45PMतंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होवून शैक्षणिक संस्था व शाळा परिसर तंबाखूमुक्‍त होण्याच्या हेतुने पोलिसांनी कोटपा कायद्यांतर्गत तंबाखूमुक्‍तीची मोहीम हाती घेतली असून सोलापुरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय शिक्षण संस्थांच्या सुमारे 500 मुख्याध्यापकांना तंबाखूमुक्‍तीची सामूहिक शपथ देण्यात आली. देशाची भावी पिढी घडवणार्‍या शिक्षक मुख्याध्यापकांना तंबाखूमुक्‍तीची शपथ द्यावी लागणे हेच खरे अंतरमुख करावयास लावणारे आहे. तंबाखूमुक्‍त शाळा करण्यासाठी कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितल्याने आता खरोखरच शिक्षक मुख्याध्यापकांनी अंतरमुख होवून शैक्षणिक संस्था व शाळा परिसर तंबाखूमुक्‍त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. तंबाखूजन्य जर्दा, खर्रा, सिगारेट-विडी धूम्रपानाच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. मी, माझे कार्यालय, घर तसेच शाळा तंबाखूमुक्‍त राखेन, असा संकल्प करीत असल्याची शपथ 500 मुख्याध्यापकांना देण्यात आली. मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आणि पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत नुकताच हा शपथ देण्याचा कार्यक्रम झाला. तंबाखू सेवन आणि धूम्रपानाचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम, विद्यार्थ्यांचे व्यसानाच्या आहारी जाण्याचे वाढते प्रमाण आणि शिक्षक व पालकांची महत्त्वाची भूमिका आदींचा विचार करता केंद्र सरकारच्या तंबाखू नियंत्रण कायदा-2003 (कोटपा) ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन अशा कार्यक्रमातून होत आहे.  

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करुन त्यांना कर्तव्यदक्ष नागरिक बनवण्याचे काम जसे शिक्षकांचे आहे, तसेच ते त्याच्या पाल्यांचे आणि स्वतः विद्यार्थ्यांचे देखील आहे. विद्यार्थ्यांचे प्रथम गुरु हे त्यांचे आई-वडील असतात, त्यामुळे आपल्या पाल्यांना सुसंस्कृत बनवण्यासह व्यसनापासून दूर राहण्याचे बाळकडू देतानाच आपल्या मुलांनी प्रथम एक चांगला माणूस आणि चांगला नागरिक व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी व्यसनापासून दूर रहावे, यात शंकाच नाही. कारण विद्यार्थी त्यांचे अनुकरण करत असतात. परंतु मुळात शिक्षक, मुख्याध्यापकांनी नैतिकता व कर्तव्य भावनेतून व्यसनापसून दूर राहणे ही काळाची गरज आहे. जरी शिक्षक एक माणूस असला तरी त्याच्यावर राष्ट्राची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असल्याने त्यांचे आचरण चांगल्या अर्थाने प्रभावी असणे आवश्यक आहे. त्यांना व्यसनमुक्‍तीची शपथ देणे म्हणजे एका अर्थाने ते सर्वांनाच अंतरमुख करावयास लावणारे आहे.