तिर्हे : प्रतिनिधी
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथे शुक्रवार,6 रोजी उघडकीस आलेल्या तिहेरी खुनाच्या चौकशीसाठी पोलिस प्रशासनाकडून पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणाचा उलगडा झाला नाही. दरम्यान, पोलिस प्रशासनाने चौकशीसाठी तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी तिर्हे शिवारातील सिद्धनाथ साखर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या तलावाशेजारी वास्तव्यास असणार्या गुजराती कुटुंबातील आईसह दोन मुलांच्या डोक्यात घाव घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्याच कुटुंबातील दोन मुलीही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिहेरी खुनाच्या तपासासाठी सोलापूर तालुका पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची पोलिस पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
परगावी गेलेले कुटुंबातील प्रमुख रणछोड जाधव हे शनिवारी सकाळी आल्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाइकांसह थेट तालुका पोलिस स्टेशन गाठले व बेपत्ता झालेल्या दोन मुली मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. जाधव कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी आरोपींच्या अटकेच्या व बेपत्ता मुलींच्या शोधासाठी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात ठिय्याच मांडला. यावेळी सोलापूर तालुका पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्यांनी जाधव यांच्याशी व इतर नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांना पोलिसांकडून आरोपी व मुलींच्या शोधासाठी कशाप्रकारे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर काही नातेवाईक तिर्हे येथे परत गेले, तर मृताचे वडील आणि काही नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शेवटी सायंकाळी उशिरा तीनही मृतदेह ताब्यात घेतले व रात्री उशिरा पाटकूल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
धुना रणछोड जाधव व वसन रणछोड जाधव या दोन्ही मुली बेपत्ता असून त्यांची छायाचित्रे पोलिस प्रशासनाकडून प्रसिद्धीस देण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनचे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँड अशा ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच सोलापूरमधून बाहेर जाणार्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवरील चित्रीकरणाची तपासणी सुरु केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी आणखी एका संशयितास ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.