होमपेज › Solapur › तिसर्‍या दिवशी ठिय्या आंदोलनास हजारोंची हजेरी

तिसर्‍या दिवशी ठिय्या आंदोलनास हजारोंची हजेरी

Published On: Aug 05 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 10:38PMपंढरपूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास तिसर्‍या दिवशी कासेगाव जि.प.गटातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व मान्यवर व्यक्तींनी आंदोलनास पाठींबा दिला. दरम्यान आज ( रविवार दि. 4 ऑगस्ट) रोपळे जि.प.गटातील गावांचा ठिय्या आंदोलनात सहभाग असून या गटातील सर्व गावांतून नागरिकांनी उत्स्फूर्त तयारी केल्याचे दिसून येते. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा शनिवार तिसरा दिवस असून शनिवारी कासेगाव जि.प.गटातील सर्वच गावांतील लोकांनी आंदोलनास उपस्थिती दर्शवली. कासेगाव, रांझणी, मुंढेवाडी, अनवली, सिद्धेवाडी, एकलासपूर, ओझेवाडी, सरकोली, नेपतगाव आदी गावांतील युवक मोटारसायकलवरून रॅली काढत आणि आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत आंदोलन स्थळी येत होते. सकाळी 11 वाजता ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपूरे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. प्रशांत परिचारक, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, पांडूरंग सहकारीचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पं.स.सदस्या राजश्री भोसले, पल्लवी यलमार, कुरूल गटाच्या जि.प.सदस्या सौ. शैला गोडसे,  मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव, विश्‍व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. अरूण महाराज बुरघाटे यांनी आंदोलनास पाठींबा दर्शवणारी पत्रे सादर केली. शनिवारी प्रा. तुकाराम मस्के, चि.शिवतेज गाजरे यांनी उपस्थितांना मराठा आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. तर अ‍ॅड. किरण मुरलीधर घाडगे यांनीही यावेळी मराठा आरक्षण आणि कायदे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. तर सायंकाळी शिवशाहीर शिवाजी व्यवहारे यांनी शाहिरी पोवाडा सादर केला. तिसर्‍या दिवशी आंदोलन अधिक तीव्र झाले असून दिवसभर आरक्षणाच्या मागणीच्या घोषणाबाजीने आंदोलन स्थळ दणाणून गेले होते.