होमपेज › Solapur › साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

भवानी पेठेतील चाटला चौकातील चाटला पैठणी सेंटर, हे दुकान फोडून दोघा चोरट्यांनी रोख रकमेसह 8 लाख 42 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपासासाठी  पोलिस  ठाण्यांच्या दोन आणि शहर गुन्हे शाखेची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.चाटला पैठणी सेंटरचे मालक लक्ष्मीकांत व्यंकटेश चाटला (वय 36, रा. 82/83, भवानी पेठ, चाटला चौक, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाटला पैठणी सेंटर हे दुकान शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बंद करून लक्ष्मीकांत चाटला हे दुकानाच्या वर असलेल्या घरी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटल्याचे कळाल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी  येऊन  पाहणी केली असता चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून पट्टी उचकटून दुकानात प्रवेश करून काऊंटरमधील लोखंडी तिजोरी उचकटून त्यातील रोख रक्‍कम व सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्याचे दिसून आले. चाटला यांनी आपल्या विविध 8 दुकानांतील माल विकून आलेली 7 लाख 82 हजार 900 रुपयांची रोकड आणि 3 तोळे वजनाच्या बिल्व्हरी अंगठ्या असा 8 लाख 42 हजार 900 रुपयांचा ऐवज तिजोरीत ठेवला होता. तो सर्व ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे, संजय भांबुरे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, संजय  पवार यांच्यासह इतर पोलिस अधिकार्‍यांनी, ठसेतज्ज्ञांनी व श्‍वान पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद झाले आहेत. ठसेतज्ज्ञांना काही संशयास्पद ठसे मिळाले असून श्‍वान तिथेच घुटमळले. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.  पोलिस निरीक्षक बहिरट तपास करत आहेत.