Mon, Jul 22, 2019 13:12होमपेज › Solapur › चोरीच्या दोन घटनांमध्ये लाखाच्या साहित्यांची चोरी

चोरीच्या दोन घटनांमध्ये लाखाच्या साहित्यांची चोरी

Published On: Feb 24 2018 9:23PM | Last Updated: Feb 24 2018 8:54PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरात उघडकीस आलेल्या चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी 1 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेऊन साहित्याला आग लावून नुकसान केले.

महेश मोहनराव क्षीरसागर (वय 44, रा. बालाजी अपार्टमेंट, गणेशनगरजवळ, सोलापूर) यांचे पुणे महामार्गावर  शिवाजीनगरजवळ अंबोली अ‍ॅटो इलेक्ट्रिकल नावाचे स्पेअरपार्टचे दुकान आहे. या दुकानाचे लोखंडी शटर कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने उचकटून दुकानातून वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटर्‍या, एलईडी टीव्ही व इतर साहित्य असा 86 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत. दुसर्‍या घटनेत लक्ष्मीनगर येथील बंद घराची कडी काढून चोरट्याने लोखंडी कपाटातील साहित्य बाहेर काढून अस्ताव्यस्त टाकून बेडरूममधील साहित्याला आग लावून 10 हजार 500 रुपयांचे   नुकसान केले. याबाबत राघवेंद्र नागप्पा जागकोंडी (वय 36, रा. आसरा सोसायटी, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत. 

गॅसचा काळा बाजार करणार्‍या तीन अड्ड्यांवर कारवाई

शहर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी चालणार्‍या गॅसचा काळा बाजार करणार्‍या तीन अड्ड्यांवर कारवाई करीत एका रिक्षासह 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सुपर मार्केट येथे गॅसचा काळा बाजार करणार्‍या सुमित सुधाकर रुपनर (वय 30, रा. हौसे वस्ती, आमराई, सोलापूर) यास अटक करुन त्याच्याकडून गॅस टाकी, वजनकाटा, रोख रक्‍कम, इलेक्ट्रिक मोटार असा 6420 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत. गेंट्याल थिएटरमागे पत्र्याच्या खोक्यामध्ये गॅसचा काळा बाजार करणार्‍या मोर्ईन म. शरीफ चौधरी (वय 35, रा. न्यू संजयनगर, सोलापूर) यास अटक करुन त्याच्याकडून गॅस टाकी, वजनकाटा, रोख रक्‍कम, इलेक्ट्रिक मोटार असा 6420 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करुन  सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सय्यद तपास करीत आहेत. जुना विजापूर नाका झोपडपट्टीत गॅसचा काळा बाजार करुन रिक्षामध्ये गॅस इंधन म्हणून भरताना महिबूब उर्फ जुबेर इब्राहिम शेख (वय 27, रा. विमानतळामागे, सोलापूर), अमीर बाबुलाल पटेल (वय 75, रा. सिध्देश्‍वरनगर, नई जिंदगी, सोलापूर), प्रकाश मधुकर सोगळे (रा. जुना रेल्वे पटरी, सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्याकडून (एमएच 13 जी 8967 क्रमांकाच्या) रिक्षासह गॅस टाकी, वजनकाटा, रोख रक्‍कम, इलेक्ट्रिक मोटार असा 6420 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करुन 2 गॅस टाकी, वजनकाटा, रोख रक्‍कम, इलेक्ट्रिक मोटार असा 38 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक फुगे तपास करीत आहेत.

फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

ओएलएक्सवर ऑनलाईन पध्दतीने मोबाईल मागविल्यानंतर पेटीएममधून पैसे भरल्यानंतर तरुणाची फसवणूक करणार्‍यांविरुध्द जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल सुभाष अंकुशे (वय 18, रा. उत्तर कसबा, मसरे गल्ली, सोलापूर, सध्या भवानी पेठ, सोलापूर) याच्या फिर्यादीवरुन 7665741253 आणि 9783985272 क्रमांकाचे मोबाईल वापरणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल अंकुशे याने ओएलएक्सवर ऑनलाईन पध्दतीने मोबाईलची खरेदी केली होती. त्यावेळी अंकुशे याने 7665741253 आणि 9783985272 क्रमांकाच्या मोबाईल नंबरवरुन सांगितल्याप्रमाणे 6850 रुपये पेटीएमद्वारे पाठविले होते. त्यानंतर 7665741253 आणि 9783985272 क्रमांकाचे मोबाईल वापरणार्‍यांनी सांगितले की, आपण फसलात, आपण येड्यात निघालात. त्यानंतर मेसेज करुन तू पण हेच काम कर, असेच करुन पैसे कमाव असे म्हणून फसवणूक केली म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मात्रे तपास करीत आहेत.

कर्मचार्‍यास मारहाण करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

थकीत वीज बिलासाठी विद्युतपुरवठा खंडित करणार्‍या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यास मारहाण करणार्‍याविरुध्द सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय दत्तात्रय माळी (वय 26, रा. काटेगाच, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या पांजरापोळ चौक, सोन्या गणपती फायनान्स बिल्डिंग, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन श्रीकांत नामदेव जाधव (रा. पटवर्धन चाळ, सोलापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय माळी हे थकीत वीज बिल वसुलीची मोहीम करीत असताना श्रीकांत जाधव याचे वीज बिल थकीत असल्यामुळे त्याच्या घराचा वीजपुरवठा खंडीत केला. त्याचा राग धरुन श्रीकांत जाधव याने अक्षय माळी यास मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणला म्हणून सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार राठोड तपास करीत आहेत.