Tue, Mar 26, 2019 20:05होमपेज › Solapur › आढीव येथे दरोडा; दोघे ताब्यात

आढीव येथे दरोडा; दोघे ताब्यात

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:57PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

आढीव (ता. पंढरपूर) येथील सोमनाथ शिवाजी कदम यांच्या घरावर 5 दरोडेखोरांनी मंगळवारी रात्री दरोडा टाकून चाकू आणि सत्तूरचा धाक दाखवून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना नागरिकांनी पकडले असून, बेदम मारहाण झाल्यामुळे जखमी दरोडेखोरांना पोलिसांनी  सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. जोकीश्‍वर नंदू भोसले (वय 24) व नंदू आगस्ता भोसले (वय 38, दोघे रा. कानडी, ता. आष्टी, जि. बीड) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

आढीव येथील विठ्ठलवाडी परिसरात बुधवारी (दि. 10 रोजी मध्यरात्रीनंतर एक ते दीड वाजण्याच्या सुमारास 5 दरोडेखोरांची टोळी दरोडा घालण्याच्या उद्देशाने आली होती. यावेळी येथील सोमनाथ कदम यांच्या घराची मागील भिंत फोडून त्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोकांना चाकू  आणि सत्तूरचा धाक दाखवून कपाटातील मंगळसूत्र, एक तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे गंठण, 1 तोळ्याचे लॉकेट, बोरमाळ 1 तोळा, कर्णफुले जोड, दोन सॅमसंग कंपनीचे मोबाईल आणि रोख रक्‍कम 10 हजार रुपये, असा सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. 

दरम्यान यावेळी शेजारील लोकांनी आरडाओरडा केल्याने  परिसरातील लोक धावून आले. यावेळी दरोडेखोर पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून उसाच्या शेतातून  टोळीतील 2 दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. तर इतर  दरोडेखोर पळून गेले. संतप्त जमावाने जोकीश्‍वर भोसले व नंदू भोसले या दोन्ही दरोडेखोरांना बेदम मारहाण केली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पो.नि. कृष्णदेव खराडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  जखमी दरोडेखोरांना पोलिसांनी  ताब्यात घेवून उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. पोलिस बंदोबस्तात दरोडेखोरांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक एस.विरेश प्रभू यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच ग्रामस्थांच्या धाडसी कामगीरीचे कौतुक केले. या घटनेचे वृत्त समजताच तालुक्यात खळबळ उडाली असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. कृष्णदेव खराडे करीत आहेत.