Sat, Apr 20, 2019 10:39होमपेज › Solapur › घरफोडी व चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक; ८ गुन्हे उघड

घरफोडी व चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक; ८ गुन्हे उघड

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:02PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून 2 लाख 46 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपीकडून पोलिसांनी 3 घरफोडीचे आणि 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

कृष्णा श्रावण शिंदे (वय 20, रा. काकानगर, सांजा रोड, उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून  बार्शी शहरातील बार्शी ते तुळजापूर जाणार्‍या रस्त्यावरील तुळजापूर नाका येथे मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरणार्‍यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे नाव कृष्णा शिंदे असे सांगितले. त्याच्याकडे मोटारसायकलच्या अनुषंगाने चौकशी केली असता ती मोटारसायकल ही चोरीच्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली.

त्यावेळी कृष्णा शिंदे याने बार्शी, उस्मानाबाद, वैराग, सोलापूर आदी ठिकाणी घरफोडी व चोरी केल्याचे कबूल केले. 

शिंदे याच्याकडून बार्शी शहर पोलिस ठाण्यातील 2, उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यातील 3, वैराग पोलिस ठाण्यातील 1, सोलापूर तालुका पोलिस ठाण्यातील 1, आनंदनगर पोलिस ठाण्यातील 1 असे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील 1 तोळ्याचे सोन्याचे गंठण, 7 दुचाकी, 1 लॅपटॉप, 9 मोबाईल हँडसेट,1 एलसीडी असा 2 लाख 46 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कृष्णा शिंदे यास बार्शी पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयााने दिले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, सहायक फौजदार नारायण शिंदे आदींनी केली.

कृष्णा शिंदे याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.