Sun, Aug 25, 2019 20:00होमपेज › Solapur › टेंभुर्णीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

टेंभुर्णीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 9:53PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

भाजप-शिवसेना शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा एल्गार शनिवारी सकाळी 11 वाजता टेंभुर्णीत होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हल्लाबोल आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती काँग्रेसच्या संस्थापक तथा खा. सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित राहून हल्लाबोल आंदोलनात सत्ताधारी शासनावर जोरदार हल्ला चढवतील. मान्यवरांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, शासनाने शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माफ केले पाहिजे. तसेच शेतकर्‍यांना शेतीपंपाचे वीजबिल माफ केले पाहिजे. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. बँकेतून कर्जाच्या याद्या घेऊन सरसकट कर्ज माफ केले, तरच शेतकरी टिकेल अन्यथा शेतकरी टिकणार नाही. शासनाने सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. भीमा, सीना नदीवर बॅरेजेस बसवावेत, या मागण्या केल्या.

तसेच साखरेच्या निर्यातीस सबसिडी दिली जात नाही, तोपर्यंत साखर निर्यात होऊ शकणार नाही. साखर निर्यात झाली नाहीतर दर वाढणार नाही.पुढील हंगामात साखरेचे मोठे उत्पादन अपेक्षित आहे. यामुळे पुढील हंगामातही खूप अडचणी असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदे हेही उपस्थित होते.