Wed, Apr 24, 2019 16:34होमपेज › Solapur › ...अखेर टेंभुर्णीचा पाणीपुरवठा सुरू

...अखेर टेंभुर्णीचा पाणीपुरवठा सुरू

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:25PM

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी

पाच वर्षांपासून रखडलेली टेंभुर्णी शहराची बहूप्रतीक्षित नवीन पाणीपुरवठा योजना अखेर सोमवारी रात्री उशिरा सुरू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे अधीक्षक अभियंता सांगली यांच्या कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण समाप्त केले आहे.

दोन महिन्यांपूर्वी टेंभुर्णी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांनी पाच वर्षांपासून रखडलेली नवीन पाणी योजना तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी उपोषण केले असता बार्शीचे उपअभियंता यांनी 30 नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा सुरु होईल, असे लेखी पत्र दिले होते. परंतु पाणीपुरवठा वेळेत सुरु न झाल्याने जहागिरदार यांनी पुन्हा कार्यकर्त्यांसह सोमवारी सकाळपासून सांगली येथे जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.

 या पाणीपुरवठा योजनेसाठी 9 कोटी शासनाने मंजूर केले होते. कामाचे भूमिपूजन 5 वर्षांपूर्वी झाले. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाची निष्क्रियता, ठेकेदार यांनी काम वेळेत पूर्ण न करता केलेली दिरंगाई व ग्रामपंचायत टेंभुर्णीच्या हलगर्जीपणामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले होते. मुलभूत सुविधेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील जनतेला तरसावे लागले. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सणासुदीत सुद्धा महिलांना पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. जुनी पाणीपुरवठा योजना बंद पडल्यात जमा आहे.

12 सप्टेंबर रोजी टेंभुर्णी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणला बसल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे बार्शीचे उपअभियंता यांनी लेखी दिले होते की, 30 नोव्हेंबरपर्यंत टेंभुर्णीची नवीन पाणीपुरवठा योजना सुरू होईल. परंतु, रविवारपर्यंत पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने टेंभुर्णी गावाची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी 4 डिसेंबर 2017 पासून अधीक्षक अभियंता जीवन प्राधिकरण मंडळ यांच्या सांगलीतील कार्यालयासमोर बशीर जहागिरदार यांनी कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले होते.सोमवारी रात्री पाणीपुरवठा सुरू झाला असल्याची माहिती दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.या उपोषणात निखिल खरात, अनिल जगताप, संजय जगताप, अमर कांबळे, तानाजी मुसळे, अक्षय धोत्रे, साईनाथ विश्‍वकर्मा, सुधीर कांबळे, भैय्या माने, अनिल खंडाळे, सुनील चव्हाण, गणेश मुलाणी आदीसहभागी झाले होते.