होमपेज › Solapur › वेगवेगळ्या मर्यादांमुळे जनता चिंताक्रांत!

वेगवेगळ्या मर्यादांमुळे जनता चिंताक्रांत!

Published On: Mar 11 2018 11:24PM | Last Updated: Mar 11 2018 10:40PMबार्शी : गणेश गोडसे 

पूर्वीच्या  पुणे-लातूर या राज्यमार्गास दोन वर्षांपूर्वीच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. सातारा-अकलूज-टेंभुर्णी-बार्शी-येडशी-लातूर अशा नवीन राष्ट्रीय महामार्गात त्याचे रूपांतर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे टेंभुर्णी-येडशी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे काय होणार, काम सुरू होणार का थांबवले जाणार, आदी अनेक प्रश्‍न उपस्थित होत होते. तसेच अगोदरच रस्ता चौपदरीकरणामुळे आपली दुकाने, घरे,जागा, शेती रुंदीकरणात जाणार या चिंतेत असणार्‍या या राज्यमार्गावरील जनतेला हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. जिल्हा मार्ग, अंतर जिल्हा मार्ग, राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग याच्या अंतराच्या मर्यादा वेगवेगळ्या असल्यामुळे आता आपले काही शिल्लक राहणार का? आपण बेकार होणार का? आदी विविध विषयांनी चिंताग्रस्त झाले आहेत. 

राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यामुळे यामार्गाची दैना फिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मार्ग केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली जाणार असल्यामुळे या मार्गास निधीची कमतरता भासणार नसल्याचे अधिकार्‍यांकडून समजते. मात्र नारळ कधी फुटणार याबाबत मात्र  अजूनही शांशकता आहे. 

टेंभुर्णी-येडशी-लातूर राज्यमार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाल्यामुळे हा रस्ते रुंदीकरणाचा उपक्रम आहे, तसा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाण्याची शक्यता जाणकारांमधून वर्तवली जात आहे. मात्र चौपदरीकरणाची व राष्ट्रीय महामार्गाची घोषणा होऊन दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून जाऊनही टेंभुर्णी ते लातूर हा राज्यमार्ग  अद्यापही राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच ताब्यात आहे.सदर रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग विभागाने अजूनही मागणी केलेली नाही. त्यामुळे सध्यातरी हा चौपदरीकरणाचा मार्ग  अधांतरीच असल्याचे सिद्ध होत आहे. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यावरच खर्‍या अर्थाने चौपदरीकरणाच्या कामास गती आली, असे म्हणता येईल. 

राष्ट्रीय महामार्गाचे मुख्यालय मराठवाड्यात झाल्यामुळे उप-कार्यालय कुर्डुवाडी अथवा बार्शी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बार्शीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षेतील टेंभुर्णी-लातूर व पंढरपूर-येरमाळा या दोन मार्गाची हद्द राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग होणार होती. त्यानुसार बार्शी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीतील कुसळंब ते येरमाळा, ता. कळंब हद्दीतील राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाने  आपल्या ताब्यात घेतला आहे. तेथे कामही गतीने सुरू आहे. 

या मार्गास राज्यमार्गावरून राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी मिळाल्याने या मार्गावरील जमिनी, गुंठेवारी आदींमध्ये भरीव वाढ झाली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या टेंभुर्णी-लातूर या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाच्या प्रक्रियेस केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे लवकरच सुरुवात होईल का, याकडे टेंभुर्णी-लातूर दरम्यानच्या लोकांचे लक्ष लागले आहे.