Mon, Jun 24, 2019 16:34होमपेज › Solapur › सामाजिक संस्थांमुळे घडताहेत ‘डिजिटल सखी’

सामाजिक संस्थांमुळे घडताहेत ‘डिजिटल सखी’

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:20PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

आर्थिक काटकसर व बचतीमध्ये महिला या पुरुषांपेक्षा अग्रेसर असतात. महिलांच्या या गुणांना अधिक चालना देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून त्यातूनच साकारलेला ‘डिजिटल सखी’ हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

सांगोला येथील अस्तित्व संस्थेतर्फे एल अँड टी फायनान्स सर्व्हिसेसच्या वित्तीय सहकार्याने व अफार्म, पुणे या संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने शहरालगतच्या कुंभारी, मार्डी व उळे या गावांत महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी  उद्योगवर्धिनी अर्थात ‘डिजिटल सखी’ हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत जुलै 2017 पासून या गावांतील 233 महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये  कुंभारी 165, मार्डी 43 व उळे 25 अशा एकूण 233 महिलांचा समावेश आहे.

वर्षभरात घेतलेल्या विविध प्रशिक्षण, कार्यशाळांमुळे बहुतांशी महिला प्रशिक्षित झाल्या असून या महिलांना उद्योगवाढीसाठी साधनांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये शिवणकाम करणार्‍या महिलांना आधुनिक शिलाई मशिन्स, दुग्ध व्यवसाय करणार्‍या महिलांना चारा तसेच कुक्कुटपालन करणार्‍या महिलांना कोंबडीच्या पिल्लांचे वाटप करण्यात आले. या व्यवसायात सहभागी महिला आधुनिक तंत्राचा वापर करून व्यवसायाची गुणवत्ता वाढवत आहेत. त्यामुळे व्यवसायाची व्याप्तीही वाढत आहे. 

महिलांचा सक्रिय सहभाग

या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक या नेतृत्व करणार्‍या गटप्रमुख महिला आहेत. या प्रकल्पात त्यांना ‘डिजिटल सखी’ असे नाव देण्यात आले आहे. डिजिटल वित्तीय व्यवहाराचा प्रचार-प्रसार करणे ही भूमिका या ‘डिजिटल सखी’ सक्षमपणे पार पाडत आहेत.

प्रकल्पात एकूण 23 ‘डिजिटल सखी’ कार्यरत असून नितीन घोडके व प्रफुल्ल बनसोडे हे दोन समन्वयक प्रकल्पाचे संचलन करीत असून उद्योजक महिलांना मार्गदर्शन, सनियंत्रण इत्यादी काम उद्योग विकासक प्रशांत गुंड हे करीत आहेत  प्रकल्पाच्या गुणवत्ता वाढीसाठी पुणे येथील अफार्म संस्थेचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी, अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, राज्य समन्वयक रश्मी दीक्षित प्रयत्न करीत आहेत.