Mon, Apr 22, 2019 04:28होमपेज › Solapur › पाणी वाटपावरून संतप्त शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना कोंडले

पाणी वाटपावरून संतप्त शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना कोंडले

Published On: Apr 09 2018 4:18PM | Last Updated: Apr 09 2018 4:18PM टेंभुर्णी : सदाशिव पवार 

सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या पाणी वाटपाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. चुकीच्या पद्धतीने पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असून, सोमवारी दुपारी शेकडो शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजनेच्या टेंभुर्णी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयातचं कोंडून निषेध आंदोलन केले.

या आंदोलनात माजी उपसभापती तुकाराम ढवळे, अरविंद खटके,अमोल खटके,नागनाथ खटके,प्रदीप कोरडे,भजनदास खटके,विनायक खटके,राजाराम नाळे,नागनाथ दुधाळ,अमोल कदम,औदुंबर करंडे, संजय पाटील,सूरज कोरडे,विजय जगताप,परमेश्वर पाटील,सीताराम तनपुरे,रमेश खटके,बापू व्यवहारे सापटने,तांबवे (टें),पिंपळनेर,पलवन, आकुंबे,आहेरगाव, भूइंजे, वेनेगाव,वरवडे आदी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.

या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी अशी होती की,पिंपळनेर वितरिकेवरील पाणीपट्टी व वीजबिल भरणाऱ्या गावांना प्राधान्याने पाणी देणे गरजेचे असताना ते दिले जात नाही. त्यांच्यावर अन्याय करीत अधिकाऱ्यांनी मागणी नसताना "टेल टू हेड" नियमानुसार मागणी नसणाऱ्या गावांना पाणी देण्यास सुरूवात केली आहे. या गावातील शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे साधे अर्जही केलेले नाहीत, शिवाय एकदाही वीजबिल व पाणीपट्टी दिलेली नाही. ज्या गावातील शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज भरले आहेत. नियमित वीजबिल व पाणीपट्टी भरत आहेत त्यांना पाणी का देत नाही. यापूर्वी उपसा सिंचन योजना सुरू होती. त्यावेळी ही याच गावांना पाणी दिले जात होते. यानंतर वीजबिल बाकी साठी या योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून ही योजना सुरू करण्यासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने ८५ लाख रुपये वीजबिल भरले. यामुळे योजना सुरू झाली आहे. मात्र योजना सुरू झाल्यानंतर पुन्हा टेल टू हेड याप्रमाणे अधिकाऱ्यांनी ज्या गावातून पाणी मागणी नाही, ज्या गावातून पाणीपट्टी वीजबिल भरण्यास विरोध केला जातो त्या गावांनाच पुन्हा पाणी देणे सुरू केल्याने पिंपळनेर वितरिकेवरील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. यामुळे त्यांनी माजी उपसभापती तुकाराम ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा टेंभुर्णीतील उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयावर नेऊन अधिकाऱ्यांचा निषेध करीत अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडले.

सोमवारी दुपारी १२ वाजल्‍यापासून या उपसा सिंचन कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना व उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंता सी.डी.घंटे यांच्यासह सात-आठ कर्मचाऱ्यांना संतप्त शेतकर्‍यांनी कार्यालयातच कोंडले. त्याचप्रमाणे पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांची सुटका न करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन तास झाले तरी आंदोलन  सुरू आहे.

दरम्यान शाखा अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईल वरून या घटनेची माहिती देऊन तिढा सोडविण्याची मागणी केली. परंतु वरिष्ठ अधिकारी सोलापुरात पालकमंत्री यांच्याबरोबर मिटिंग मध्ये असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.